NC Times

NC Times

शिंदेच्या शिवसेनेत जाणार का? मिलिंद नार्वेकरांचं सूचक हास्य


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑफर दिल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून एका नार्वेकरांचं अर्थात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपकडून चर्चेत होतं. इतक्यातच आता शिंदे यांच्या शिवसेनेने मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून लढण्याचा प्रस्ताव दिल्याचं बोललं जात आहे. याबाबत पत्रकारांनी मिलिंद नार्वेकरांना गाठून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र नार्वेकरांनी हसून बोलणं टाळलं.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मिलिंद नार्वेकर 'मातोश्री' येथे निघाले होते. यावेळी वाटेत काही पत्रकारांनी त्यांना अडवलं आणि शिंदे गटाने दक्षिण मुंबईतून लढण्याचा प्रस्ताव दिल्याबाबत विचारणा केली. मात्र नार्वेकरांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं. नार्वेकरांचं सूचक हास्य काय सांगतं, याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात होता. मिलिंद नार्वेकरांच्या मौनांची भाषांतरं पत्रकार करत राहिले.
महायुतीचा उमेदवार अद्याप अनिश्चित
महायुतीकडून दक्षिण मुंबईत अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. या जागेसाठी भाजप इच्छुक असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची बैठकही 'सागर' बंगल्यावर घेतली होती. या जागेसाठी भाजपचे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यशवंत जाधव हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण, अद्याप हा मतदारसंघ कोणाला सुटणार हे निश्चित नाही. त्यामुळे आता या जागेवर भाजप उमेदवार असणार की शिंदे येथून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर नार्वेकर यांना रिंगणात उतरवणार, हे पाहावं लागेल.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. आता त्यांनाच शिंदेंनी निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरु शकतो. महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, याची उत्सुकता आहे.