NC Times

NC Times

अभिनेते सचिन पिळगावकर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार?


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)- लोकसभा निवडणूक २०२४ करता प्रत्येक पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर केली जात आहे. प्रत्येक प्रतिष्ठेच्या जागेसाठी अनेक नावे चर्चेत येतात, नेहमीप्रमाणे यंदाच्या  निवडणुकी आधीदेखील अशी विविध नावे चर्चेत आली आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही यामध्ये मागे नाहीत. याआधी काही कलाकारांनी लोकसभेचं तिकिट मिळवलं असून, मुंबईतील एका जागेसाठी तीन दिग्गज मराठी कलाकारांची नावे चर्चेत आलेली आणि ही जागाही तशीच प्रतिष्ठेचीच आहे! या जागेसाठी नाव चर्चेत आलेल्या ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
मुंबईतील ही जागा म्हणजे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ. संजय निरुपम यांची काँग्रेसने हकालपट्टी केली, त्यानंतर अशी शक्यता वर्तवली जात आहे की त्यांना उत्तर-पश्चिम मुंबई या जागेवरुन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून तिकीट मिळू शकते. त्यांच्याशिवाय अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेते सचिन खेडेकर यांचेही नाव या जागेसाठी चर्चेत आले. या चर्चा धुडकावून लावत सचिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  सचिन पिळगावकर काय म्हणाले?
सचिन यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवा माझ्या कानावर आली आणि मी हसलो. एवढच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं माझ्या प्रेक्षकांचा आहे, ६१ वर्ष मी आपला आहे... सचिन पिळगांवकर'.
 बापलेकाचा संघर्ष टळला
महायुतीतून या मतदारसंघात अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही, तर महाविकास आघाडीतून ठाकरे गटातर्फे अमोल कीर्तिकर यांना तिकीट मिळालं आहे. विद्यमान खासदार आणि अमोल यांचे वडील गजानन कीर्तिकर यांनी बापलेकातील संघर्ष टाळण्यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता महायुतीकडून या जागी कोणाला उमेदवारी दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.