NC Times

NC Times

साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांचे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यांनी आपल्या जलमंदिर पॅलेस येथून पारंपरिक बैलगाडीतून भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या महारॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सातारचे पालमंत्री शंभूराज देसाई या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
 खा.उदयनराजेंची ताकद वाढवण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, नामदार महेश शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे लोकसभा समन्वयक अतुल भोसले, मनोजदादा घोरपडे, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले, भाजप महिला आघाडीच्या चित्रलेखा माने-कदम, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत जाधव, वसंतराव मानकुमरे, भरत पाटील, आरपीआयचे अशोकबापू गायकवाड, सचिन नलवडे, प्रियाताई शिंदे, सुरभीताई भोसले आदीची उपस्थिती होती.
खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातारच्या गांधी मैदान येथून महायुतीच्या रॅलीला सुरुवात होऊन मोती चौक, देवी चौक मार्गे शेटे चौकातून ही रॅली पुढे पोलीस मुख्यालयापासून पोवई नाक्यावर गेली. तेथे खासदार उदयनराजे भोसले आणि सर्वच प्रमुख नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन खा.उदयनराजेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच साताऱ्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना उमेदवारी अर्ज सुपूर्त केला.
 खासदार उदयनराजे भोसले यांना ताकद देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे सातारच्या मुख्य रस्त्यांवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या विचाराचा जनसागर लोटलेला पाहायला मिळाला.