NC Times

NC Times

तुमचा पक्ष फुटला म्हणून तुमच्‍या सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या का- महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील

 
नवचैतन्य टाईम्स शिर्डी (प्रतिनिधी )-
बारामती लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. त्यावरून मुळच्या पवार आणि बाहेरून आलेल्या पवार असा वाद सुरू आहे. यासंबंधी शरद पवार यांनी केलेल्या विधानावर टीका सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावरून टीका केली आहे. पवार यांचे नाव न घेता विखे पाटील म्हणाले, ‘पक्ष फुटला तर तुम्‍हाला तुमच्‍या सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या का?’ शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत बोलताना विखे पाटील यांनी ही टीका केली.
बारामती मतदारसंघात मतदारांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले होते की, बारामतीकरांनी आतापर्यंत लेकीला निवडून दिले, आता सुनेला निवडून द्यावे. पवार आडनाव असेल तिथे मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले होते. यासंबंधी पत्रकारांनी ज्येष्ठ नेते पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते की, बारामतीकरांनी पवार आडनावाच्या मागे उभे राहाययला हवे, त्यात चकू काय आहे? दोन गोष्टी असतात एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार, असे उत्तर पवार यांनी दिले होते. त्यावरून ही टीका सुरू झाली होती. त्याच संदर्भाने विखे पाटील यांनीही पवार यांच्यावर निशाणा साधला.                                       आपल्या भाषणात विखे पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ व्‍यक्तिव्‍देशापोटी विरोध केला जात आहे. त्यासाठी देशातील नेते एक‍त्र आले आहेत. परंतू त्यांच्याकडे देशाच्‍या विकासाचा कोणताही अजेंडा नाही. यांच्‍या आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवारही अद्याप ठरलेला नाही. या सर्व राजकीय पार्श्‍वभूमीवर देशातील जनतेने आता पुन्‍हा मोदी यांनाच पंतप्रधान करण्‍याचा निर्धार केला आहे. मोदींच्या नेतृत्‍वाखाली समृध्‍द भारत घडत असून, मागील दहा वर्षांत देशाचा झालेला विकास पाहाता जगामध्‍ये मोदींचे नेतृत्‍व हे विश्‍वमान्‍य झाले आहे. भ्रष्‍ट्राचारमुक्‍त कारभारामुळे योजनांचा लाभ थेट लाभार्थ्‍यांपर्यत मिळू शकला असल्‍याचेही विखे पाटील म्हणाले.