NC Times

NC Times

सांगलीत अखेर तिरंगी लढत विशाल पाटील यांची बंडखोरी कायम आत्ता तीन पाटलांची होणार लक्षवेधी लढत

 
नवचैतन्य टाईम्स सांगली (प्रतिनिधी)-काँग्रेस नेत्यांच्या मनधरणीनंतरही विशाल पाटील यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवलेला आहे. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीची अडचण वाढली आहे. सांगलीत आता तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे आता सांगलीच्या रिंगणात तीन पाटील असतील. तिघांपैकी कोणते पाटील मैदान मारणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल.
 सांगलीत ७ मे रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून महाविकास आघाडीनं बरेच प्रयत्न केले. पण विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही. विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. पण विशाल पाटील यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवला.
विशाल पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आल्यानं सांगलीत आता तिरंगी लढत होईल. विशाल पाटील यांनी सोशल मीडिया पेजवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला. कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांनी अर्ज कायम ठेवला. विशाल पाटील यांना कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. त्यासाठी पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत.
 सांगलीत भाजपनं विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते २०१४ पासून सांगलीचं प्रतिनिधीत्त्व लोकसभेत करत आहे. भाजपनं त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर ठाकरेसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील रिंगणात आहेत. विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो.