NC Times

NC Times

उध्दव ठाकरेच टेन्शन वाढलं विशाल पाटील यांच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल


नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)  महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आता पाटील यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत ते अपक्ष म्हणून अतिरिक्त अर्ज दाखल करणार आहेत. विशाल पाटील यांच्या बंडाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
जागावाटपामध्ये सांगली लोकसभेची जागा मिळावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी फारच आग्रह धरला होता. सांगली जिल्ह्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यासाठी दिल्लीलाही फेऱ्या मारल्या होत्या. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्याने काँग्रेसला सांगलीच्या जागेवर पाणी सोडावे लागले.
जागावाटपामध्ये सांगली लोकसभेची जागा मिळावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी फारच आग्रह धरला होता. सांगली जिल्ह्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यासाठी दिल्लीलाही फेऱ्या मारल्या होत्या. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्याने काँग्रेसला सांगलीच्या जागेवर पाणी सोडावे लागले.
सांगली लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच यावेळी पंजा हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह मतदान यंत्रावर नसणार आहे. साहजिकच सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेल्याने संतापलेल्या विशाल पाटील यांनी अखेर बंडखोरीचा निर्णय घेतला. सोमवारी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी खरसुंडी या गावी जाऊन कुलदैवत सिद्धनाथाचे दर्शन घेतले.
आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सिद्धनाथाची कृपादृष्टी नेहमीच पाठिशी राहिली आहे. येणारा काळ कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित ऊर्जा देणारे आहे’, असे पाटील यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमातून म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा लढवत आहेत. विशाल पाटील निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले तर सांगलीत तिरंगी लढत होईल.
मतविभाजनाची धास्ती
काँग्रेसच्या विशाल पाटील यांना मागच्या लोकसभा निवडणुकीत ३ लाख ४४ हजार मते मिळाली होती. भाजपचे संजयकाका पाटील यांना पाटील यांनी कडवी झुंज दिली होती. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाविरोधात महाविकास आघाडीतील विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरे गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.
काँग्रेसची मते जर पाटील यांच्या मागे गेली तर मग ठाकरे गटाच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघातील विजयाचे गणितही मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. बंडखोरी होऊन होणाऱ्या मतविभाजनाचा भाजपच्या उमेदवाराला निश्चितच फायदा मिळणार आहे. त्यामुळे आता विशाल पाटील यांना माघार घ्यायला काँग्रेस राजी करते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.