NC Times

NC Times

काँग्रेसने फक्त 'एवढंच' सांगावं मी उमेदवारी मागे घेण्यास तयार-चंद्रहार पाटील


नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)-महाविकास आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित केल्यापासून तेथील राजकारण चांगलेच तापले आहे. कॉंग्रेस पक्षाचे सांगलीतील नेते अपक्ष उमेदवारी लढवण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीद्वारे प्रचारसभा व मेळावे घेतले जात आहेत. आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शिवसेनेचे (ठाकरे गट) सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. चंद्रहार पाटील यांनी म्हटले की,' महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेल की ज्याची चार वेळा उमेदवारी घोषित करुनही मित्रपक्ष लांब आहेत. शेतकऱ्याचा मुलगा खासदार नको की सांगलीत शिवसेनेची ताकद कमी आहे.'
'मी मातोश्रीवर पक्षप्रवेश केला तेव्हा माझी पहिल्यांदा उमेदवारी घोषित करण्यात आली परत उद्धव ठाकरेंच्या मिरजमधील विराटसभेत दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. नंतर शिवसेना पक्षाने पत्राद्वारे अधिकृत घोषणा केली व शेवटी महाविकास आघाडीच्या यादीत मला सांगलीतून उमेदवारी दिली. असे चारवेळा उमेदवारीची घोषणा करूनही मविआतील काही घटक पक्ष अजूनही आमच्यापासून लांब आहेत.', असे पाटील यांनी म्हटले. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे प्रमुख उपस्थित होते पण सांगलीतील कॉंग्रेसचे पदाधिकारी अनुपस्थित होते. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला आहे.
चंद्रहार पाटील यांनी सामाजिक क्षेत्रातील कामगिरी लोकांसमोर मांडत म्हटले की,' २८ वर्षानंतर मी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. सांगली जिल्ह्याला ३५ वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. गोवंश संवर्धनासाठी मी भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेचंही आयोजन केले.' पाटील यांनी पुढे असेही म्हटले की,' माझा बाप आमदार, खासदार नाही. माझे आजोबा मुख्यमंत्री ,आमदार,खासदार नाही. माझा साखर कारखाना नाही. शेतकऱ्याचा मुलगा आम्हाला उमेदवार म्हणून चालणार नाही असे कॉंग्रेस पक्षाने जाहीर करावे मग मी उमेदवारी मागे घेईन.'
 सांगली लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी अपक्ष व कॉंग्रेस मधून अर्ज भरला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत फूट पडून याचा फटका निवडणुकीच्या निकालावर होणार की महाविकास आघाडीचे नेते कॉंग्रेसच्या नेत्यांची नाराजी दूर करुन मतभेद मिटवणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.