NC Times

NC Times

स्वीडिश महिला जैविक आईच्या शोधात नागपूरमध्ये दाखल; म्हणाली 'एकदा तिला कडाडून मिठी मारायची आहे'


नवचैतन्य टाईम्स नागपूर प्रतिनिधी(दिपक वाघ)- कोणीतरी माझ्या आईला भेटवण्यासाठी माझी मदत करा, मला तिला मिठी मारायची आहे, तिला फक्त एकदा भेटायचं आहे... हे शब्द आहेत आपल्या आईला शोधण्यासाठी सातासमुद्रापार आलेल्या एका मुलीचे आहेत. मागील कित्येक दिवसांपासून ती आपल्या आईच्या शोधात असून परदेशातून नागपुरात पोहोचली आहे.
 ४१ वर्षीय पेट्रीसिया एरिकसन स्वीडनमधून भारतात आली आहे. पेट्रीसिया तिच्या बायोलॉजिकल अर्थात तिला जन्म दिलेल्या आईच्या शोधात आहे. तिच्या आईने तिला जन्म झाल्यानंतर अनाथाश्रमात सोडलं होतं. हीच मुलगी आता या बायोलॉजिकल आईचा शोध घेत स्वीडनमधून नागपुरात वणवण भटकते आहे.
 काय आहे प्रकरण?
४१ वर्षीय पेट्रीसिया एरिकसन स्वीडनमधून तिला जन्म दिलेल्या आईला शोधण्यासाठी नागपुरात आली आहे. तिच्या आईने लग्नाआधीच पेट्रीसियाला जन्म दिला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला एका अनाथाश्रमात सोडलं. त्यानंतर अनाथाश्रमात सोडलेल्या त्या मुलीला एका स्वीडनमधील कुटुंबाने दत्तक घेतलं. आता हीच मुलगी ४० वर्षांनंतर तिच्या आईला शोधण्यासाठी भारतात आली आहे. आता आपल्या आईला भेटल्याशिवाय परत जाणार नसल्याचं तिने सांगितलं आहे.
 मीडिया रिपोर्टनुसार, पेट्रीसियाने सांगितलं, की फेब्रुवारी १९८३ मध्ये तिचा जन्म झाला होता. पण लग्नाआधीच आई बनलेल्या तिच्या अविवाहित आईने तिला एका अनाथाश्रमात सोडलं. ज्यावेळी ती एक वर्षाची होती, त्यावेळी तिला एका स्वीडिश कुटुंबाने दत्तक घेतलं आणि ती स्वीडनला गेली. ज्यावेळी तिला समजलं तिची बायोलॉजिकल आई भारतात आहे, त्यावेळी ती तिला शोधण्यासाठी भारतात आली.
 तिने ती ज्या अनाथाश्रमात होती, तिथेही तिच्या आईची चौकशी केली, पण तिला आईबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तिने भारतीय नियमांनुसार, जिथे-जिथे मुलं आणि आई-वडिलांचा रेकॉर्ड असू शकतो, अशा सर्व ठिकाणी जन्मदात्रीचा शोध घेतला. पण तिला कुठेही तिची आई सापडली नाही. आंगणवाडी, शाळा, पोलीस स्टेशन आणि शांतिनगरमधील जुन्या भागातही तिने शोध घेतला पण तिची आई सापडली नाही.
 पेट्रीसियाने सांगितलं, की तिला तिच्या आईचं केवळ नाव माहिती आहे. पण अशी शांता नावाची महिला तिला कुठेही आढळली नाही. पेट्रीसिया म्हणते, ती आता ३ मुलांची आई आहे, त्यामुळे आई असणं काय आहे हे ती समजू शकते. ती इथे कोणालाही जज करण्यासाठी आलेली नाही. स्वीडिश आई-वडिलांची आभारी आहे, की त्यांनी माझी चांगली देखभाल केली, मला इतकं मोठं केलं. माझ्याकडे त्यांचे आभार मानण्यासाठीही शब्द नाहीत.
 पण तिला लहानपणापासूनच तिच्या खऱ्या आईला भेटण्याची इच्छा आहे. ती तिच्या शहरात कोणत्याही सावळ्या रंगाच्या महिलेला पाहिल्यानंतर तिच्याजवळ जात होती. आता तिने तिच्या दत्तक घेतलेल्या कागदपत्रांचा तपास सुरू केला आहे.