NC Times

NC Times

काँग्रेस-ठाकरे गटात संघर्ष टोकाला मावळमध्ये उमेदवारीवर प्रश्नचिन्ह पुण्यात ही धुसफूस सांगलीचे कनेक्शन


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा ‘तिढा’ तूर्तास सुटला असला, तरी मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचारातील ‘वेढा’ कायम आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे.
 मावळ मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत नाहीत. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी न होण्याच्या सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समन्वयक सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मावळमध्ये उफाळून आलेल्या आघाडीतील वादाला पुण्यात फोडणी बसली आहे. मात्र, त्याचे ‘कनेक्शन’ सांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगलीत महाआघाडीच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विशाल पाटील यांचे विमान गुजरातच्या दिशेला जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद काँग्रेसमध्ये उमटले. काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आमचे विमान सुरळीत चालेल; परंतु, तुमचे हेलिकॉप्टर कधी भरकटेल, सांगता येत नाही,’ असा टोला लगावत राऊत यांनी चुकीची वक्तव्ये करू नयेत. आमच्या पक्षाच्या राजकारणात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया डॉ. कदम यांनी व्यक्त केली.
मेळाव्यात अनुपस्थिती
मावळमधील महाआघाडीच्या घटक पक्षाचा पहिला संयुक्त मेळावा नुकताच रहाटणी येथे झाला. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कदम आणि कार्यकर्ते अनुपस्थित होते. त्याबाबतची तक्रार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अहिर यांच्याकडे केली. त्यानंतर अहिर यांनी पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याची तंबी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिली. मावळमधून सुरू झालेल्या मूळ वादाला अशाप्रकारे फोडणी मिळाली. मात्र, त्याचे कनेक्शन सांगली असल्याचे स्पष्ट झाले.                                            ठाकरे गटाच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी
पुण्यातील शिवसेनेच्या भूमिकेमुळे मावळमधील काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यावर मर्यादा ठेवण्यास सांगावे. पक्षप्रमुखांनी राऊत यांना समज द्यावी. यापुढील काळात उपाहासात्मक आणि तीव्र स्वरुपाची वक्तव्य होत राहिल्यास आघाडीच्या प्रचारात बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे.
सांगलीतील उमेदवारीच्या मुद्यावरून खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी आघाडीत बिघाडी होईल, अशी वक्तव्ये करू नयेत. इंडिया आघाडीचे विमान सुरळीत चालणारे आहे. तुमचे हेलिकॉप्टर कधी भरकटेल सांगता येत नाही. यापुढील काळात आघाडीचा प्रचार सुरळीत कसा राहील, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.