NC Times

NC Times

राजू शेट्टी आणि उध्दव ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही- मा.आमदार सतेज पाटील


नवचैतन्य टाईम्स इचलंकरजी प्रतिनिधी(राजेंद्र पाटील)-शिवसेना ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची चर्चा फिस्कटल्याने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. या निर्णयानंतर हातकणंगलेच्या जागेचा तिढा संपुष्टात आला आहे. यावरच बोलताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी बोलताना 'स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही', अशी तिरकस प्रतिक्रिया दिली.
 साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही
हातकणंगलेची जागा ठाकरे गटाची होती आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती. राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र त्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळालेले नाही. राजू शेट्टी आमच्या बरोबर यावेत ही आमची प्रामाणिक भूमिका होती. ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला होती जर काँग्रेसकडे असती तर आम्ही सर्वांना विचारून त्वरित निर्णय घेतला असता. स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही. आता ठाकरे गटाने त्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ, असे सतेज पाटील म्हणाले.
 आमची ताकद 'त्यांना' कळेल!
शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पूर्ण पाठिंबा त्यांना असेल. आमची मतदारसंघात ताकद आहे. ही जागा लढवली नव्हती म्हणून ही ताकद आजपर्यंत रस्त्यावर आली नव्हती. आता निर्णय झाला आहे. आता ही ताकद रस्त्यावर उतरेल. या मतदारसंघातील सर्व नेत्यांना एकत्र करून बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवू, असेही सतेज पाटील यावेळी म्हणाले.
 हातकणंगलेचा निकाल लागला, सांगलीचा कधी?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा प्रश्न निकाली लागला. मात्र अद्याप सांगलीच्या जागेचा तिढा महाविकास आघाडीमध्ये कायम आहे. या जागेवरून काँग्रेस नेते विश्वजीत कदम नाराज झाले आहेत. या संदर्भात काल विश्वजीत कदम आणि सतेज पाटील यांच्यातही चर्चा झाली. यावरच बोलताना ते म्हणाले, "सांगलीची चर्चा वरिष्ठ पातळीवर अद्याप सुरू आहे. विश्वजीत कदम हे सांगली काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. ही जागा आपण सोडवून घेऊ शकलो नाही म्हणून ते थोडेसे नाराज आहेत. मात्र अद्याप आम्ही आशा सोडलेली नाही. आता हा प्रश्न दिल्ली स्तरावरूनच मार्गी लागेल. एक दोन दिवसात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे तिघेजण बसून मार्ग काढतील"
 पुणेकरांनी धंगेकरांना आपला उमेदवार ठरवलेले आहे
पुणेकरांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना आपला उमेदवार ठरवलेले आहे. जनतेचा आणि सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून धंगेकर आहेत, अशी परिस्थिती पुण्यात आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल अशी आशा सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.