NC Times

NC Times

इस्टिमेट नुसार न होणारे काम थांबवा धनाजी खिलारी यांची प्रशासनाकडे मागणी


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)- निंबवडे रोड ते गळवेवाडी गावाच्या शिवेपर्यंत आटपाडी नगरपंचायती च्या वतीने रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून काम व्यवस्थित करा असे सांगितल्यानंतर "तुम्ही आमची मापे काढू नका" अशी अरेरावीची भाषा संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून केली जात आहे. खरंतर लोक भरत असलेल्या टॅक्स मधूनच सरकारी कामे केली जात असतात परंतु या शिकलेल्या कॉन्ट्रॅक्टरला हे कदाचित माहीत नसावं. सदर कामावर इस्टिमेट प्रमाणे मोजमाप करून खडी, मुरूम व पाणी मारले जात नसल्याचे दिसत आहे. सदर कामावर वेळोवेळी सांगून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी आतापर्यंत गेलेला नाही.

ऑफिसमध्ये थांबूनच काम व्यवस्थित चालू आहे असे सांगितले जात आहे व वेळ मारून नेण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे. एवढेच काय मुरूम व खडी रस्त्यावर व्यवस्थित बसवण्यासाठी व्हायब्रेटर रोलर चा वापर केला जात नाही. साध्या रोलर चा वापर करून काम उरकण्याची घाई केली जात आहे.व कामाची बिले काढली जात आहेत.डेपोटी इंजिनियर यांच्याशी संपर्क साधून काम बंद करण्याची मागणी केली असता "जसे आहे तसे चालवून घ्या" काम बंद करता येणार नाही असे सांगितले जात आहे. थोडीशी खडी टाकून मुरूम अंथरला जात आहे व साधा रोलर फिरवला जात आहे.पाणी न मारता केलेले काम जास्त दिवस टिकेल असे दिसत नाही. त्यामुळे झालेले काम पूर्णपणे उकरून नव्याने काम करावे अन्यथा या रस्त्यासाठी वापरला जाणारा लोकांचा कर रूपी पैसा खड्ड्यात जाणार आहे. त्यामुळे नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे मापदंडानुसार न केलेले रस्त्याचे काम थांबवावे व चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी धनाजी खिलारी यांनी केली आहे. एकूणच गुणवत्ता तपासणारी यंत्रणाच मॅनेज केली तर आटपाडी शहरासह तालुक्यात चांगली कामे कशी होणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे