NC Times

NC Times

अमोल कोल्हेना अजितदादा नटसम्राट म्हणाले तर कोल्हेनी अजितदादाना पलटीसम्राट म्हणत हल्ला


नवचैतन्य टाईम्स पुणे पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-शरद पवार गटात असलेले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'नटसम्राट' म्हणून टीका केल्यानंतर डॉ. कोल्हे यांनीही अजित पवार यांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला करत "पलटीसम्राट आणि खोकेसम्राट म्हणत त्यांनी अजितदादांना डिवचले. 'पलटीसम्राट आणि खोके सम्राटापेक्षा नटसम्राट कधीही चांगले.." असे म्हणत अजित पवार यांच्या टीकेवर कोल्हेंनी पलटवार केला.
खेड तालुक्यातील सांडभोरवाडी-काळूस जिल्हा परिषद गटात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता. दरम्यान काळूस गावात बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील समाधीबाबत देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि पालकमंत्री अजित पवार यांना घेरलं. ते म्हणाले की एवढे वर्षे समाधी वढू बुद्रुक-तुळापूरला असताना काहीजण अनेक वर्षे खासदार होते, तुम्ही एवढे वर्षे पालकमंत्री होतात, मग मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो की, तुम्ही आजपर्यंत या समाधीस्थळाला एकही रुपया का दिला नाही?       
नटसम्राट आणि कार्यसम्राट असलेले चांगले पण पलटीसम्राट आणि खोके सम्राट नको
कलाकार म्हणून जी कला सादर केली, त्यामाध्यमातून माझ्या राजाचा इतिहास १५७ देशांमध्ये पोहचवला. ज्याला तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवता ना, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला. सगळी प्रलोभने असताना दहा-दहा वेळा इकडे ये असे फोन केलेले असताना, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाशी आणि विचारांशी प्रामाणिक राहिलो, भूमिका कोणी बदलली हे सर्वांनाच माहिती आहे. नटसम्राट आणि कार्यसम्राट असलेले चांगले पण पलटीसम्राट आणि खोके सम्राट नको, अशा शब्दात कोल्हे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले.
मोदींना मत मागायला आलेल्यांना विचारा, शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या सरकारला कसे मतदान करायचे?
पुढे ते बोलताना म्हणाले की, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागायला येणाऱ्यांना आता प्रश्न विचारला पाहिजे की दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला कसे पंतप्रधान करायचे? शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले सरकार घरी बसवण्याची हीच ती वेळ आहे. १० वर्षे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली अजूनही माती कलवायची नाही म्हणून आता हे सरकार उलथून टाकण्याची ही वेळ आली आहे. असे म्हणत भाजपच्या केंद्र सरकार देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले.