NC Times

NC Times

झुंज




खातगुण गावातील बौध्द वस्तीमध्ये कोंडीबा सावकर हा एक प्रयत्न संपन्न माणूस रहात होता.आयुष्याचा 
बराचसा कालावधी  हा मुंबईत कष्टाची अवजड कामे करण्यात घालवल्यामुळे कनवटीला बक्कळ पैसा जमला होता. म्हारकीच्या शिवारात विहीर काढायची हे खूळ त्याच्या डोक्यात कितीतरी वर्षे धुमाकूळ घालीत होते. आता ते खुळ चांगलेच बळावले होते. गावात रामा कुसा हे परिसरातील विहिरी खोदण्याची कामे अंगावर घेतातअशी माहिती मिळाल्यानंतर कोंडीबा सावकाराचा जीव जरा भांड्यात पडला होता.गावात फेर फटका मारण्यासाठी नुकतेच बाहेर पडले होते. श्रीरामंदिरा लगतच्या दोन नंबरच्या शाळे जवळून जात असताना त्यांना भागवत या मुलाची अचानक आठवण झाली.मग त्यांनी आपला मोर्चा मराठी शाळेकडे वळवला. भागवत हा त्यांचा मुलगा सातवीमध्ये शिकत होता.तो निव्वळ दगडातला दगड होता.परंतु शेख गुरुजींमुळे तो हिऱ्या सारखा चमकला.गणिते सोडवू लागला. पुढे पुढे तो इंग्रजी लिहू व बोलू लागला. लाला शेख, गुलाब साठे, व इनामदार गुरुजींची उभ्या उभी भेट घेण्यासाठी शाळेत आले होते. कमरेला पांढरे शुभ्र धोतर अंगात दोन बटणाची निळ्या रंगाची पैरण आणि डोक्यावर लाल भडक पटका,शरीरयष्टी काटक व कांबी सारखी  लवचिक होती. वर्ण काळा सावळा, चालताना  पायताणे वजनाने कुरकुरायची. पाच पैशाला एक कप असे चार कप चहा आदरा पोटी शिक्षकांनाआल्या आल्याच सांगितला होता. नामु कोळ्याचा काटकुळा प्रल्हाद आणि सोनाराचा बुटका पांडा या दोघांनी पळत जाऊन शाहू वाण्याच्या हाॅटेलमधून गरम किटलीत लगोलाग चहा आणला होता. एरव्ही मुंबईत साध्या टपरीतील चहा पिणारे कोंडीबा आज गुरुजींच्या पंगतीला बसून मिशा बुडस्तवर चहा पीत होते. मारुती माळ्याच्या चिम्याला व मला त्यामुळे हसू आवरता आले नाही. शनिवार असल्याने शाळा बारा वाजायच्या आत सुटणारच होती. आणि आमचे सर्व लक्ष घंटेकडे लागले होते. शाळेचा गजर झाला.आणि वर्गातील उत्साही लोंढा घरच्या ओढीने दप्तराच्या ढगळ्या पिशव्या पाठीवर टाकुन वर्गाबाहेर पडत होता.तालमी पुढील कट्ट्यावर बाळकु भगत संतांचे अभंग हळुच आवाजात म्हणत बसले होते.अंगात दोन बटणाची पैरण व कमरेला पांढरे धोट धोतर होते. डोकीला पांढरा शुभ्र पटका गुंडाळलेला होता, गळ्यात श्री पांडुरंगाची माळ आणि कपाळावर उभा चंदनाचा नाम व टिळा शोभून दिसत होता. उंची पाचफुटाच्या आत बाहेर असेल, त्यांचे पाठांतर प्रचंड होते.परंतु लोकांना त्यांची खरी किंमत कळली नव्हती. त्यांच्या संदर्भात  एका प्रसंगाचा मी साक्षी होतो. विसापूरच्या वाटेवर,श्री राम ओढा ओलांडली की, त्यांची शेत जमीन लागते. तेथे अनेक मजूर लोक दीड परुसभर विहीरीत खोदकाम करीत होते.टिकाव, खोरे व लोखंडी पहारीचे खणाखंण आवाज उसळत होते. पाणी लागावे म्हणून त्यांनी पांडुरंगाला आर्त हाका मारत भजन गात कठड्यावर बसले होते. तेव्हा त्यांच्या विहीरीच्या आतील गोलाकार भागातून प्रचंड पाण्याचे स्त्रोत व कारंजे उडत असल्याचे प्रत्यक्ष आम्ही गुरामागे असताना पाहिले होते. तेथपासुन मी त्यांना देव माणूस म्हणून ओळखत होतो.त्या थोर देव माणसाच्या  हळुच पाया पडलो.तेव्हा त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे किती तरी प्रेमाने पाहिले होते.रस्त्याच्या पलीकडे कासमभाई घरासमोरील कट्ट्यावर आराम खुर्चीत हातामध्ये लोड केलेली बंदुक घेऊन भीष्माचार्या सारखे निवांतपणे पहुडले होते.वडाच्या झाडावरील एकमेकींशी भांडत असलेली वटवाघळे बंदुकीने अंधांतरी टिपत होते.भिंतीतील लोखंडी गोलाकार कड्याला साखळीने बांधून ठेवलेला टायगर नावाचा कुत्रा येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांच्यावर सतत भुंकत होता. खातगुण गावात  बहादूर साहेब (श्रीरंग लावंड ) साहेब, पांडुरंग पाटील व कासम भाई या तिघांकडेच डबल बाराच्या बंदुका होत्या. कासम भाईचे लाकडी माडीचे सुंदर असे देखणे घर होते.गावात चांगले वजन होते.भारदस्त शरीरयष्टीला शोभतील असे मस्तका वरील केस,चेहरा खुनशी व निर्भिड होता. अंगात नेहरू शर्ट व कमरेला रंगीत लुंगी गुंडाळलेली नेहमी दिसत होती. बाहात्तरच्या दुष्काळा नंतर एकोणीसशे त्र्याहत्तर सालात पावसाने नुसता कहर आकांत मांडला होता. खटाव तालुक्यातील लोकांची पावसा अभावी झालेल्या  दैयनीय उपासमारी मुळे पावसाला अश्रू आवरत येत नव्हते.जणू पावसाचे आतून डोळे आले होते.खातगुण,विसापूर,पुसेगाव, नेर बुध, वर्धनगड वडूज या परिसरात अनेक ढगांच्या कावडी एक सारखा ओतीत होता. श्रीराम ओढा व येरळा नदीला महापूर आले होते. किशाभाऊ पाटलाच्या वाड्याला पाणी लागलेले मला अजून ही आठवते आहे. तलावात तर पाणी मावत नव्हते.प्रचंड लाटा हाणीत तो स्वतः च्या मिशीला पीळ देत होता. दहशत निर्माण करत होता. पाण्याच्या गुळण्या तो सांडव्या वरुन सारख्या ताकदीने एका मागे एक फेकीत होता. नेर तलावाच्या गोड्या पाण्यावर  खातगुण पुसेगाव पंचक्रोशीतील ज्वारीची पीके त्यावर्षी बहरुन आली होती. शेतातील जोंधळ्याच्या सात आठ फुटाच्या ताटावर मोत्यांची पांढरी शुभ्र कणसे वाऱ्यावर माना डोलवत निळ्या आकाशाखाली शिवाराची शोभा पहात होती. त्या वर्षी अनेकांना ज्वारी खंडी,दिड खंडी झाली होती. भारत सरकारला  ही उत्पन्नाची माहिती पाटकऱ्या मार्फत मिळाली होती. सरकार दरबारी कर स्वरुपात लेव्ही. आकारण्यात आली होती.खातगुण गाव म्हणजे ज्वारीचे मुर्तीमंत आगार होते. कासम भाईंना मुलाणकीच्या शिवारात बक्कळ ज्वारी झाल्यामुळे सरकारला लिव्ही या कर स्वरुपात आठ पोती ज्वारी परत करण्याची जोरदार तयारी सुरु ठेवली होती. तर गावचे पांडुरंग पाटील यांनी दहा बारा पोती दुसऱ्या बैलगाडीत भरण्याचे काम ताकदवान गडी करीत होते. गावात दोन्हीही बैल गाड्यांची मिरवणूक एकसाथ निघाली होती. कासमभाई व पांडुरंग पाटलांनी हातामध्ये ऐटदार बंदुका  घेऊन बाबू गुरवाच्या व तेल्याच्या दुकाना समोर मिरवणूक येताच एक साथ बंदुकीचे बार हवेत उडवले होते. त्यांचे आवाज गाव शिवारात मोठ्यांदा उठत होते. गुजराच्या माडीच्या घरावरील विटांच्या खोबणीत रहावा करणारे पोपटांचे थवे उंच आकाशात भितीने भिरभिरत दिसेनासे होत होते. मिरवणूक वाण्याच्या चौकात आली तेव्हा लोकाची संख्या वाढत होती.कासम भाईंनी 
रेवाप्पांच्या दुकानासमोर आकाशात नेम धरून गोळ्या झाडल्या. पांडुरंग पाटलांनी हवेत गोळी बार करताच कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने लोक कानावर हात ठेवत होते.आणि दुसऱ्या दिवसा पासुन गावात लेव्ही. भरण्याची दहशत सुरु झाली.प्रत्येकांनी घरात, दारात आडुशाला माचोळीवर,सोप्यात धान्याच्या कणगी काठोकाठ भरुन ओलसर शेणा मातीने लिंपून घेतल्या होत्या.आता ही धान्य लक्ष्मी विनासायास लुटली जाणार या विचारांनी लोकांच्या झोपा उडून गेल्या होत्या.सासरला जाताना लेकीचा गळा दाटून यावा तशी गावात सायंकाळचा अंधार दाटूनआला होता.राम ओढा नदी व  गाव शिवारात रात्र सेकंदाने वाढत होती.घराघरात दिवे लागण होत होती. श्रीराम ओढ्याच्या पलीकडे रहाणारे दाऊद भाईनी राॅकेलवर चालणाऱ्या चिंचोळ्या आकाराच्या चिमण्यांची कापडी वात पेटवून चावडी, चौकात उजेड निर्माण केला होता. अंधुक उजेडात चौका चौकात माणसे उजेडात  बसायला येत होती. इतक्यात बनेखान चौका चौकात उभे राहून,एक हात कानाला लाऊन चढ्या व मोठ्या आवाजात दवंडी देत फिरत होते. लोक हो!ऐक हो ऐका ???"उद्या वडूजवरुन तहसिलदार, आणि सेवक व सनदी अधिकारी लेव्ही,वसुलीसाठी येणार आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी उत्पन्नातील ज्वारीचा तिसऱा हिस्सा प्रत्येकाला द्यावा लागणार आहे हो !".ही बातमी ऐकून गावात एकच तारांबळ व खळबळ उडाली होती. चौकात,चावडी जवळ माणसांची नुसती पांढर उठली होती. ती रात्र गावकऱ्यांनी मोठ्या महा मुष्किलीने काळजीत घालवली.ग्रामीण भागातील देव नागरिकांना त्रस्त करण्यासाठी सनदी राक्षसी वृत्तीचे अधिकारी गावात चावडी जवळील ग्रामपंचायत समोर लाल दिव्याच्या गाड्या घेऊन अकरा वाजता अचानक भूता सारखे उपस्थित झाले होते,आणि गावात माणसे चिडी चुप होऊन भितीने गारठून गेली होती. श्री नवनाथ शिर्के सरपंच व सदस्य अधिकाऱ्यांना पंचायतीच्या इमारतीत बसवून चहा पान करण्यासाठी धावा धाव करीत होते. 
नामु कोळी शिपाईगिरी दाखवत सर्वांच्या पांढऱ्या शुभ्र बशीत गरम चहा ओतीत होते आणि सनदी अधिकारी चवीने चहाच्या घोटा बरोबर आज वसुलीला सुरुवात कोठून करावी या विचारांच्या तंद्रीत होते. रस्त्यावर कोणीही पुरुष मंडळी फिरकत नव्हती. लोक घरातच नित्याची कामे करण्यात गढून गेली होती. सुगीचे दिवस संपून आता ऐन उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले होते. विशेष करुन आळोआळी बायकांनी पहाटे पासुनच पापड, भातवड्या, बोटवं व सांडगे तयार करण्याचा चांगलाच घाट घातला होता.मुजावर आळीतील तुकाराम झांजुर्णे यांच्या घरासमोरील मोकळ्या व अघळपघळ जागेतील अंगणात पांढऱ्या शुभ्र धोतरावर तयार केलेला खारट व चवदार पांढरा गरम रस पळीपळीने ओतून गरगटुन त्याला गोल आकार देण्यासाठी आसपासच्या बऱ्याच पोक्त व वयस्कर महिला एकत्रित जमल्या होत्या. त्या मध्ये राधा दळवीण, मुळकाची म्हातारी, शिवदास कारंडेची आई, अविनाश झिरपेची आई, शंकर सरांची आई संभा बुवांची आई, श्रीरंगची आई,गोरखची आई पबा पोस्टमनची आई, हरी ओंम बाबाची आई, व कृष्णाजीची सुन यांची काम धाम उरकल्या नंतर मोकळी झालेली खरकटी भांडी पाण्याने धुवावयाससुरवात केली होती.बरोबर बारा वाजता अचानक सरपंच सदस्य व शिपाई लोक तहसीलदार व त्यांचे हाताखालील दोन शिपाई नगरखान्या खालून शिवराम दादांच्या बोळातून पायतांनाचा आवाज काढीत तुकाराम झांजुर्णे यांच्या घरामोर आले होते. तेथून पुढे जात असताना तहसीलदा राचे लक्ष श्री तुकाराम झांजुर्णे यांच्या उघड्या दारातून सोप्यात एका ओळीने लावलेल्या तीनचार मोठमोठ्या कणगीकडे गेले होते,आणि त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्ती जागी झाली.तात्काळ पुढे गेलेल्या हाताखालच्या शिपायांना माघारी बोलवून बाहेरुन दिसत असलेल्या सोप्यातील कणगीकडे हात करुन त्याने बिनदिक्कत विना परवानगी फोडण्याचा हुकूम दिला.आणि हुकमाचे ताबे दारांनी अंगणातील कडेकडेने घरात प्रवेश  केला,आणि कणगीचे लिंपण उचकटू लागले.तेथेच बायका भांडी स्वच्छ करत असताना सौ सुभा आक्कांच्या लक्षात आले की दोन झटिंगच आपण घाम गाळून पिकवलेल्या धान्याच्या कणगींशी झटापट करत आहेत. जंगलातील जखमी वाघीण चवताळावी तशी  ती एका झटक्यात उंबरा पार करुन सोप्यात आली. तिने दोन्हीही शिपायांना चापटायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यांनी शिपाई गांगरुन गेले होते. दान्हीही शिपायांना घराबाहेर हुसकावून लावले.तो पर्यंत ही लुटालुटीची बातमी साऱ्या मुजावर आळीत पसरली. एवढेच नव्हे तर गावात वाऱ्या सारखी पसरली आणि बघ्यांची तोबा गर्दी उसळली. 
गोंधळामुळे दर्गा परिसरात असणारी गावठी कुत्री माणसांना पाहुन मोठ मोठ्याने भुंकू लागली. आपले दोन शिपाई बाहेर आलेले पहाताच अधिकारी खूपच संतापला होता. त्याने स्वतः सोप्यात येऊन कोणालाही न जुमानता कणगींची लिंपन जोराजोराने उचकटू लागला. सौ. सुभा झांजुर्णे आक्काची तळ पायाची आग पुन्हा मस्तकात शिरली होती. घर आपलं धान्य आपले हे कोण राक्षस आपल्या पवित्र घरात शिरले आहेत. या विचारांनी त्या पुन्हा जखमी वाघीन बनल्या.भय़कर क्रोधित देवीचे रुप त्यांनी धारण केले.आपल्या दोन्ही हातांनी त्याची मागुन मानगुटी व बकोटी पकडून, त्याला वाकडा तिकडा फिरवत उंबऱ्यापर्यंत खेचून आणला होता.आता सर्वशक्ति एकवटून उंबऱ्या बाहेर विद्युत वेगाने ढकलून दिले. तो अधिकारी उंबऱ्याला ठेच लागून 
अडखळत सरळसरळ अंगणात वाळत घातलेल्या ओलसर भातवड्यात तोल जाऊन लडबडत गेला.सर्व कपडे लडबडले होते. त्याची ही अवस्था पाहून गाव सारा फिदी फिदी हसत होता. मात्र त्याचा माज व रुबाब एका सर्व सामान्य माझ्या गावच्या महिलेने उतरवावी ही सामान्य गोष्ट नव्हती. त्यानंतर ही मिरवणूक तेथून पुन्हा माघारी ग्रामपंचायतीकडे निघाली तेव्हा गावातील सर्व कुत्री तो अवतार पाहुन भुंकत होती.अत्यंत घाईघाईने हे लोक आणलेल्या चार चाकी गाडीतून वडूजला निघुन गेली होती.मात्र त्या नंतर कोणताही सरकारीअधिकारी गावात ली.व्ही. वसुलीसाठी फिरकला सुध्दा नाही. ज्यांना भरणे शक्य आहे त्यांनीच भरावी असा पर्याय दिला गेला. आख्या गावाला लेव्ही भरण्याची सवलत मिळालेली होती. सौ.सुभा झांजुर्णे आक्कीने दिलेली झुंज अत्यंत शौर्य व अतुल साहस दाखवणाऱ्या माझ्या खातगुण गावच्या इतिहासाचे धाडशी सोनेरी पान आहे.वरील प्रसंगाची चर्चा मात्र गाव व पंचक्रोशीत मोठ्या चवीने वर्णन केली जात होती,