NC Times

NC Times

घाटमाथ्यावर रमजान ईद उत्साहात तर घाटनांद्रेत शिरखुर्म्याचे वाटप


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे)-कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरी घाटनांद्रे, गर्जेवाडी,जाखापुर व कुची परिसरात मुस्लीम समाजात  पवित्र मानला जाणारा व परस्परांशी स्नेहभाव वाढविणारा 'रमजान ईद' अर्थात 'ईद- उल- फित्र' हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर जाऊन नमाज अदा केली.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुस्लिम समाजातील या पवित्र 'रमजान ईद' सणाची गुरुवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली.त्यानिमित्त मुस्लीम बांधव एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देत होते.एकमेकांना शुभेच्छा देउन गोड प्रसादाचे वाटपही केले होते.या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी,महिलांनी घरोघरी नमाज,रोजा,कुराण पठण,यासह धार्मिक उपक्रम पूर्ण केले.या महिन्याच्या पूर्णत्वानंतर इदगाह मैदानावर पवित्र नमाज अदा करून रमजान महिन्याची सांगता करण्यात आली.इदगाह मैदानावर कवठेमंहाकाळ तालुक्याच्या ग्रामीण भागासह तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कवठेमंहाकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्याबरोबरच पोलीस बांधवाकडूनही
उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांना रमजान ईदच्या  शुभेच्छा देण्यात आल्या.
तर सांयकाळी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील दर्ग्यामध्ये मुलाणी कुटुंबाच्या वतीने शिरखुर्म्याचे वाटप केले.याचा ग्रामस्थांनी यथोचित लाभ घेतला.याचे संयोजन शफीक मुलाणी,अकबर मुलाणी,नादू मुलाणी, साईल मुलाणी,आयन मुलाणी,असद मुलाणी यांनी केले.