NC Times

NC Times

घड्याळ गेल्यामुळे वेळ जुळेना- मा.अमोल कोल्हे


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार अशा तीन सुट्ट्या सलग आल्याने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेली नेतेमंडळी कामाला लागली आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विविध कार्यक्रम, लग्न समारंभांना उमेदवार हजेरी लावत आहेत. त्यामुळे सध्या तरी मतदार 'राजा' झालेला आहे. शिरुरचे विद्यमान खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंनी एका लग्न सोहळ्याला हजेरी लावली. त्यांनी वधू वरांना दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. या विवाह सोहळ्यात खासदार डॉ. कोल्हे यांनी तुतारीचा प्रचार करण्याची संधी मात्र सोडली नाही. दरम्यान विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यास उशीर झाल्यामुळे डॉ. कोल्हे यांनी "घड्याळ निघून गेल्यामुळे वेळ जुळेना" असं म्हणत "वधूवरांच्या आयुष्यात सुखाची तुतारी वाजावी" अशा मिश्किल शब्दांत शुभेच्छा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हटके शुभेच्छांना आणि हजरजबाबीपणाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
 काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे लग्नाला येण्यास विलंब झाल्याचं म्हणत कोल्हेंनी दिलगिरी व्यक्त केली. 'मला येण्यास थोडा उशीर झाला. आल्या आल्या कोणीतरी मला गेटवर विचारलं, आता घड्याळ सुटलं का? वेळ काय जुळना झाली? मी त्यांना लगेच म्हटलं, घड्याळ सुटलं म्हणून वेळ जुळना झाली. पण वधू वरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी,' असं कोल्हे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.