NC Times

NC Times

महाराष्ट्राच्या राजकारणाचे पलटूराम? जानकरांनी भंडारा उधळून उडवली मविआची धूळवड


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे) 
शरद पवारांकडे माढा आणि परभणी लोकसभेची जागा मागणारे जानकर महायुतीत गेल्याने काय फरक पडणार आहे? तर महायुतीमध्ये आता जानकरांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. बारामती लोकसभात मतदारसंघात धनगर मतांचा प्रभाव आहे. शिवाय ओबीसी मते ते खेचून आणू शकतील. एवढंच नाही तर माढ्याचे भाजप उमेदवार निंबाळकरांना अडचण यामुळे दूर होणार आहे. महायुतीकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उेदवारी मिळेल, अशा चर्चा आहेत. परंतु आता त्यांच्याऐवजी जानकर बारामतीमधून नशीब आजमावतील, असं चित्र दिसून येत आहे.
रविवारी (दि. २४) पुन्हा महायुतीच्या छत्रछायेखाली गेलेल्या जानकरांची भाषा बदलल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, भाजप छोट्या पक्षांना संपवत असल्याचा आरोप मी केला होता, हे खरं असलं तरी आता त्यांनी मला लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केलं आहे.
मात्र कोणत्या मतदारसंघाचं तिकीट त्यांना देऊ केलंय, याबाबत महादेव जानकरांनी काहीही सांगितलं नाही. महायुतीचे तीन वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील, असं जानकर म्हणाले.
जानकर पुढे म्हणाले की, भाजपने विधान परिषदेवर संधी दिली होती, मंत्रिपदही दिलं होतं. हे विसरता येणार नाही. आता महायुतीचे तीन नेते ठरवतील आणि मला उमेदवारी देतील, मी नक्कीच खासदार होणार आहे, यात शंका नाही. शरद पवार मला वडिलांसारखे आहेत, त्यांच्याशीही माझी चर्चा सुरु होती. परंतु मी आधीपासूनच महायुतीसोबत होतो आणि पुढेही राहणार आहे. असं म्हणत त्यांनी ऐन होळीच्या दिवशी महाविकास आघाडीची धुळवड करत भंडाचा उधळला.