NC Times

NC Times

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना जाणार? भाजपचा धडकी भरवणारा प्रस्ताव


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. मनसे शिवसेनेत विलीन करा आणि पक्षाची धुरा तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव भाजपकडून राज यांना देण्यात आला. तुम्हीच बाळासाहेबांच्या हिंदुत्त्ववादी विचारांचे खरे वारसदार आहात. त्यामुळे शिवसेनेचं नेतृत्त्व तुम्हीच करा, असा प्रस्ताव भाजपकडून राज यांना देण्यात आला आहे
 दिल्लीत झालेल्या भेटीत शहांनी राज यांच्यासोबत व्यापक युतीसंदर्भात चर्चा केली. लोकसभा निवडणूक आणि जागावाटप यांच्यापलीकडे दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या विषयांवर दिल्लीभेटीत सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
'भाजप राज ठाकरेंकडे दीर्घकाळचा सहकारी म्हणून पाहत आहे. याचा फोटो दोन्ही पक्षांना होईल. शिंदेंच्या शिवसेनेत मनसे विलीन करा आणि सेनेचे प्रमुख व्हा, असा प्रस्ताव राज यांना भाजपकडून देण्यात आला. या निर्णयाचा मोठा राजकीय फायदा तुम्हाला होईल, असं भाजपकडून राज यांना सांगण्यात आलं,' अशी माहिती सुत्रांनी दिली. राज यांनी लोकसभेच्या ४८ जागांवर एनडीएचा प्रचार करावा. त्याच्या बदल्यात विधानसभेत त्यांनी सन्मानजनक जागा आणि सत्तेत वाटा देण्यात येईल, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला आहे.
भाजपनं त्यांच्या योजनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली आहे. पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी यांना योजनेची कल्पना द्या. त्यांच्यात सहमती घडवून आणा, अशी सूचना करण्यात आली आहे. 'शिंदे शिवसेनेचं नेतृत्त्व राज यांच्याकडे सोपवण्यास अनुत्सुक आहेत. यामुळे राजकीय कारकीर्द संपून जाईल अशी भीती त्यांच्या मनात आहे. पण भाजप आपल्या प्रस्तावावर ठाम आहे. लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी तुम्हाला मुख्यमंत्रिपदावरुन कायम ठेवलं जाईल, असा शब्द शिंदेंना भाजपकडून देण्यात आला आहे,' अशी माहिती सुत्रांनी दिली.