NC Times

NC Times

भाजपा माढ्यात जाहीर केलेली उमेदवारी मागे घेणार, सातारची दादांची जागा भाजपला!


नवचैतन्य टाईम्स  सातारा जिल्हा    प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-पश्चिम      महाराष्ट्रातील बारामतीनंतरचा सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ असलेल्या माढ्यात पक्षांतर्गत विरोधामुळे भाजपवर मोठी नामुष्की ओढावली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट बदलून ती जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाला मिळणार आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात लढत होईल. दुसरीकडे माढ्याच्या बदल्यात साताऱ्याची अजित पवार गटाकडील जागा भाजपला मिळणार असून त्याजागी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वृत्त आहे.                                                उमेदवारी बदलण्याची भाजपवर मोठी नामुष्की
माढा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांचे समर्थक संतापले आहेत. कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्धारही बोलून त्यांच्याकडून दाखविला जात आहे. दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करण्यास रामराजे निंबाळकर यांनीही असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांकडून रणजितसिंह निंबाळकर यांची कोंडी होत असल्याने तसेच मतदारसंघातली सध्याची समीकरणे भाजपला अनुकूल नसल्याचे पाहून ही जागा अजित पवार गटाला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतली असल्याची माहिती आहे.
 उदयनराजेंची उमेदवारी निश्चित
भाजपकडून राज्यसभेवर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. राजेंना उमेदवारीसाठी वेटिंग करावीच कशी लागते? असा संतप्त सवाल ते विचारत आहेत. उदयनराजे देखील साताऱ्यातून लोकसभा लढविण्यास आग्रही आहेत. हे ध्यानात घेऊन माढ्याऐवजी सातारा ताब्यात घेऊन भाजप उदयनराजेंना रिंगणात उतरविणार आहे. बुधवारी उदयनराजे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर गुरूवारी ते गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला पोहोचले आहेत. गुरूवारी रात्री त्यांची भेट होणे अपेक्षित असून या भेटीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे वृत्त आहे.
गिरीश महाजन यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीचे आधीच दिले होते संकेत!
खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची उमेदवारी निश्चित होईल. संसदीय पक्षाच्या सदस्यांशी चर्चा करत असून, लोकसभेची तिसरी यादी जाहीर होईल, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाजन यांनी सोमवारी उदयनराजे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली होती.