NC Times

NC Times

उदयनराजे यांना उमेदवारी नाही; कार्यकर्ते आक्रमक, राजीनामा देण्याच्या निर्णयाची चर्चा


नवचैतन्य टाईम्स  सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भाजपने गेल्या वेळी लढवलेल्या २० जागांवरील आपले उमेदवार घोषित केले आहेत. तर साताऱ्याच्या जागेवरुन अद्याप तिढा कायम आहे. भाजपकडून राज्यसभेवर असलेले खासदार उदयनराजे भोसले लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, साताऱ्यातून त्यांना तिकीट मिळणार का, याची चर्चा सुरु आहे. अशातच पत्रकारांनी उदयनराजेंना प्रश्न विचारला आणि त्यांनीही 'तिकीट' या शब्दाला धरुन धमाल कोटी केली.
तिकीटवाटपाचा घोळ सुरु आहे, त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी विचारला. "काय सांगायचं.. माझ्याकडे तिकीट आहेत ना.. प्लेनचं आहे, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बसचं आहे.. बाकीची तिकीटं अजून माहिती नाहीत.. ते ठरवलं जाईल त्यावेळेस बघू" असं म्हणत उदयनराजे मिश्कील हसले.
भाजपकडून तिकीट मिळेल असं वाटत आहे का तुम्हाला? असा पुढचा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावेळी उलट दिशेने चालत निघालेला पत्रकार पाय अडखळून पडत होता. हाच विषय धरुन "अरे बाबा पडू नकोस... आम्ही पडलो तर चालेल.. तू पडता कामा नयेस" असं म्हणत उदयनराजेंनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
 "पुढचा निर्णय काय असेल, याबाबत आताच बोलणं योग्य ठरणार नाही.. फारच प्राथमिक स्टेज आहे.. तीन पक्षांचं एकत्र सरकार आहे महायुतीचं... सीटवाटपात पुढे मागे होतंच.. त्यांच्या त्यांच्या पक्षाचं.. अजित दादा असतील... एकनाथ शिंदे असतील.. भाजप असेल.. प्रत्येकाला वाटतं... त्यांना तिकीट मिळालं पाहिजे.. त्यात काही चुकीचं नाही.. ठरेल त्यावेळी बघू" अशी सावध प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.
लोकसभेची इच्छा यापूर्वी व्यक्त
सातारा लोकसभा निवडणूक शरद पवार गटातर्फे खासदार श्रीनिवास पाटील लढणार आहेत, त्यांना आपण तगडं आव्हान देणार का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वीही उदयनराजेंना विचारण्यात आला होता. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, आपले विचार मांडण्याचा. श्रीनिवास पाटील वयाने मोठे तर आहेतच, वडीलधारे व्यक्तिमत्त्व आहेत, यावर "तुमची काय इच्छा आहे?" असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, "माझी? मी उलटं विचारतो... तुमची सर्वांची काय इच्छा आहे?" असं म्हणत उदयनराजेंनी प्रश्नाचा चेंडू टोलवला होता. "लोकसभा लढायची आहे का यावेळेस?" असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर "प्रत्येकाची इच्छा असते, मी काही अपवाद नाही" असं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं होतं.