NC Times

NC Times

लोकसभा निवडणुकांचे बिगुल आज दुपारी सहा ते आठ टप्प्यात मतदान प्रक्रियेची शक्यता


आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा पुढील काही तासांत संपणार आहे. आज, शनिवारी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले.
 लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाऊ शकतात. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होतील की नाही, हेही आज, शनिवारी स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाने ‘एक्स’वर याबाबतची माहिती दिली.
 दरम्यान, नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह हे दोघेही आज निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना उपस्थित असतील.
 यावेळी लोकसभा निवडणूक साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत सहा ते आठ टप्प्यांत होऊ शकते असे मानले जाते. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही लागू होणार आहे. निवडणुकीतील भ्रष्ट-आचार रोखण्यासाठी यावेळी अनेक नवी पावले उचलली आहेत, असा दावा आयोगाने केला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत देशातील सुमारे ९७ कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
 याआधीच्या (सन २०१९) सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक १० मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते. तेव्हा ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत निवडणूक झाली होती. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. २३ मे रोजी मतमोजणी झाली होती.
 तेव्हा ५४३ पैकी भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. या विजयासह पक्षाने केंद्रात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. द्रविड मुन्नेत्र कळघमला (द्रमुक) २४, तर वायएसआरसीपी व तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी २२ जागा जिंकण्यात यश आले होते.