NC Times

NC Times

वसंत मोरे पुणे मतदारसंघाच्या पाठिंब्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीपासून 'वंचित' राहिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे आज मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. पुणे लोकसभेसाठी इच्छुक असताना पक्षीय आणि संघटनात्मक पाठिंबा मिळवण्यासाठी वसंत मोरे वणवण फिरताना दिसत आहेत. अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकल्यानंतरही लोकसभेची तयारी 'तात्यां'नी सुरु ठेवली आहे. काल वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांची भेट घेत मोरेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोनवरून संपर्क केला होता. आज ते प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मुंबईतील राजगृह येथे रवाना झाले आहेत.
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेत निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार उतरवलेत. आठ उमेदवारांची यादीही त्यांनी जाहीर केली. यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांचं देखील नाव आहे. तर काँग्रेसच्या दोन उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र आता वसंत मोरे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांना पुणे लोकसभेची जागा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.
वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. पक्षाचा पाठिंबा नसतानाही वसंत मोरे स्वबळावर प्रचार करत आहे. यापूर्वी त्यांनी मराठा समन्वयकांच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यासोबत छोट्या मोठ्या पक्ष संघटनांची भेट घेत आहेत.
 वसंत मोरे यांना जर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली, तर नेमका कोणाला फायदा किंवा तोटा होऊ शकतो? हा प्रश्न आहे. वसंत मोरे हे मराठा उमेदवार आहेत. त्यांनी नुकतीच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याचंही ठरवलं आहे. जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक झाल्याचं खापर हे राज्यात सत्तेत असलेल्या सरकारवर फोडलं होतं. त्याचा मोठा इम्पॅक्ट महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना बसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केल्याने मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसू शकतो. त्यामुळे वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली तर ती कशी निर्णायक ठरेल हे पाहणं महत्त्वाचं असेल.