NC Times

NC Times

भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेलाच लावला सुरुंग करमाळ्याच्या रश्मी बागल गटाने केला भाजपात प्रवेश


नवचैतन्य टाईम्स सोलापूर प्रतिनिधी (रावसाहेब काळे)-सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा समजला जातो. करमाळा तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या बागल गटाने आता स्थानिक विकास मुद्याचे कारण पुढे करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात प्रवेश केला आहे. मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत बागल गटाचा भाजप प्रवेश झाल्याने शिंदे गटाला जबरदस्त झटका लागला आहे.तीन ते चार दिवसांअगोदर बागल गटाने भाजप प्रवेश करत असल्याची जोरदार चर्चा सोलापुरात सुरू होती.बागल गटाच्या भाजप प्रवेशाने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
स्थानिक विकासासाठी भाजप शिवाय पर्याय नाही म्हणून भाजप प्रवेश
दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी कोलतै-बागल व पुत्र दिग्विजय बागल हे करमाळा तालुक्यात बागल गटाचे अस्तित्व टिकवून आहेत. तीन दिवसांअगोदर करमाळा येथे बागल गटाच्या बैठकीत दिग्विजय बागल यांनी एक वक्तव्य केले होते. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तसेच अनेक वर्षे रखडलेली रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे दिग्विजय बागल यांचे म्हणणे आहे.या बैठकीस दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्यासह या गटाचे मार्गदर्शक विलास घुमरे आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर तसेच या गटाचे समर्थक उपस्थित होते                                                                     
स्वर्गीय दिगंबर बागल यांचा राजकीय प्रवास
करमाळा तालुक्यात स्वर्गीय माजी मंत्री दिगंबर बागल यांचा राजकीय प्रवास ३५ वर्षापूर्वी मोहिते-पाटील गटाच्या माध्यमातून सुरू झाला होता. १९९५ साली करमाळा विधानसभा निवडणुकीत बागल हे मोहिते-पाटील समर्थक म्हणूनच अपक्ष आमदार झाले होते. त्यानंतर मात्र दिगंबर बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती. नंतर ते काँग्रेसमध्ये आले होते. दिगंबर बागल यांच्या निधनानंतर बागल गट पुन्हा राष्ट्रवादीत परतला होता. त्यांच्या पत्नी शामल बागल यांना राष्ट्रवादीने आमदार केले होते. परंतु तालुक्यातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन २०१९ साली रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळूनही रश्मी बागल यांना पराभव पत्करावा लागला होता.