NC Times

NC Times

आघाडी धर्म पाळून मित्रपक्षांना सहकार्य करा, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा 'आदेश


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची समजूत घालण्यात आली असून या तिन्ही मतदारसंघांत राज्यातील नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळावा आणि मित्रपक्षांना सहकार्य करावे, असे थेट आदेशच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिले आहेत. दरम्यान, या मतदारसंघात कोणतीही बंडखोरी होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही नेते मंडळींना देण्यात आली, असे सूत्रांकडून समजते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच सांगली या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या जागेसाठी काँग्रेस इच्छुक असल्याने या घोषणेविरोधात राज्यातील पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रश्नी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी थेट दिल्ली दरबारीही दाद मागितली. अखेर शुक्रवारी यासंदर्भात महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली. या बैठकीत सर्व नेत्यांना या तिन्ही जागांवर आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करावा, असा प्रस्ताव महाराष्ट्रातील नेत्यांनी शुक्रवारी दिल्लीत दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या चर्चेत या जागांचा आढावा घेण्यात आला. त्याचवेळी महाराष्ट्रातील नेत्यांनी या तीन जागांवर पक्षाने उमेदवार जाहीर करून मैत्रिपूर्ण लढत द्यावी, अशी मागणी केली. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांचा हा प्रस्ताव दिल्लीने फेटाळून लावला. असे झाल्यास मतांचे विभाजन होऊन भाजपला त्याचा फायदा होईल, त्याशिवाय ‘इंडिया’मध्ये त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात, त्यामुळे या प्रस्तावाला नकार देण्यात आला आहे, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली.
मुंबईतील दोन जागांसाठी मात्र आग्रही
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी शुक्रवारीही मुंबईतील अनेक नेत्यांकडून दिल्लीत करण्यात आल्याचे समजते. सध्या मुंबईत काँग्रेसला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार आहे. या मतदारसंघासोबत अन्य एक मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न सुरू असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.  मुंबईतील जागांसाठी मैत्रिपूर्ण लढत?
महाविकास आघाडीमध्ये असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या यादीमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. सांगलीसारख्या काही जागा या पारंपरिक काँग्रेसच्या आहेत. त्या जागेवर काँग्रेसला विश्वासात घेऊन घोषणा करणे अपेक्षित होते. त्यामुळे मुंबईतील सहा जागांवर काँग्रेसने मैत्रिपूर्ण लढत द्यावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी शुक्रवारी दिली.