NC Times

NC Times

मलाही मारण्यासाठी तेथे बोलावले होते,हा कट होता,तेजस्वी घोसाळकर यांचा धक्कादायक आरोप


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांवर दबाव असून या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्यरित्या केला जात नाही, असा आरोप अभिषेक घोसाळकर यांचे वडील आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात पोलिसांना काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फूटेज देऊनही त्या दिशेने तपास केला जात नसल्याची खंत व्यक्त करतानाच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी घोसाळकर कुटुंबीयांनी यावेळी केली.
धक्कादायक बाब म्हणजे, मॉरिस नरोना याने कार्यक्रमासाठी अभिषेकसोबत आपल्यालाही बोलावले होते, परंतु उशीर होत असल्यामुळे अभिषेकने मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवले, असा दावा त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे. माझ्या मुलांच्या सुदैवाने मी तिथे गेले नाही, आणि माझा जीव वाचला, असं तेजस्वी म्हणाल्या.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या तपासाची माहिती देण्यासाठी विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अनिल परब, अजय चौधरी, विलास पोतनीस आदी उपस्थित होते.
अभिषेक यांच्या हत्येदरम्यान घटनास्थळी अभिषेक आणि मॉरिस नरोना या दोघांना मारणारा तिसरा कोणी होता का, या दृष्टिकोनातूनही तपास करा, अशी आमची मागणी आहे. जर यात कोणी सहभागी असेल, तर चौकशीतून स्पष्ट होईल. यासंदर्भात आम्ही न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहोत, असे विनोद घोसाळकर म्हणाले.
हत्येप्रकरणी कुठल्याही राजकीय व्यक्तीचे नाव घेणार नाही, असे म्हणत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी त्‍यांनी केली. राजकारणी लोक निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांवर दबाव टाकत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्याचवेळी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर काही राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना ती बेजाबदारपणाने केल्याचे यावेळी नमूद केले.
‘तपास योग्य दिशेने होत नाही’
अभिषेक घोसाळकर यांच्या निर्घृणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. या तपासाबाबत आम्ही जमा केलेली माहिती तपास यंत्रणेला आणि पोलिस आयुक्तांना सीसीटीव्ही फूटेजसह सादर केली. हत्येच्या वेळेस या ठिकाणी अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सखोल तपास करावा, अशी मागणी केली होती. परंतु याबाबत पोलिसांनी आजवर सखोल तपास केलेला नाही. यासंदर्भात १२० ब कलम लावण्याची मागणी केली होती, ती मागणीही मान्य करण्यात आलेली नाही, असे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले. यावेळी न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणाची माहितीही त्यांनी दिली.