NC Times

NC Times

घाटनांद्रेत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पावणे दोन लाखाचे नुकसान


नवचैतन्य टाईम्स  घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे (ता.कवठेमहांकाळ) येथील आण्णाभाऊ साठेनगर येथील रहिवासी राजाराम शिवाजी रास्ते यांच्या घरी घरगुती गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन त्यांच्या रहाते घर व घरातील संसार उपयोगी साहित्यसह,दोन मोबाईल असे प्रथम दर्शनी सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.यामुळे सदर कुटुंब पुर्णतः निराधार झाले आहे.त्यामुळे ते नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की घाटनांद्रे (ता कवठेमंहाकाळ) येथील रहिवासी राजाराम शिवाजी रास्ते यांच्या घरी गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उज्वला गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला.सदर स्फोटामध्ये राजाराम रस्ते यांच्या घराचे,घरातील संसार उपयोगी साहित्य,दोन मोबाईल व महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आदीचे सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ते जळून खाक झाले आहे.या दुर्घटनेनंतर तलाठी श्रीम पी एस वायदंडे,सरपंच अमर शिंदे,पोलीस पाटील एकनाथ शिंदे,कोतवाल शिवाजी वाघमारे व काही पंच लोकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. 
      रास्ते कुटुंबीय हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असल्याने ते या घटनेने पुर्णतः निराधार झाले आहे.ते कुटुंबास अर्थसहाय्य व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहेत.