NC Times

NC Times

पुणे सातारा व पुणे नाशिक 'या' दोन महामार्गावरील १ एप्रिल पासून टोलमध्ये वाढ होणार


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक महामार्गावरील टोलमध्ये एक एप्रिलपासून दरवाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील प्रवास महागणार आहे. साधारण अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे.
 पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी येथे टोलनाके आहेत. या टोल नाक्यांवर मोटार, जीप व हलक्या वाहनांना पूर्वी ११५ रुपये टोल आकारला जात होता. त्यामध्ये पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी १२० रुपये टोलसाठी मोजावे लागतील. खेड शिवापूर टोल नाक्यावर बस आणि ट्रकसाठी ३९० रुपये दर होता. नवीन निर्णयानुसार या वाहनांना आता चारशे रुपये मोजावे लागणार आहेत. अवजड वाहनांसाठी खेड शिवापूर टोल नाक्यावर ६१५ रुपये टोल आकारला जात होता. आता त्यात १५ रुपयांनी वाढ झाली असून, या वाहनांना ६३० रुपये टोल भरावा लागणार आहे.
 पुणे-नाशिक मार्गावर चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाके आहेत. या टोल नाक्यांवर मोटार, जीप व हलक्या वाहनांसाठी १०५ रुपये टोल होता. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एकेरी वाहतुकीसाठी आता ११० व दुहेरी वाहतुकीसाठी १६० रुपये वाहनचालकांना मोजावे लागणार आहेत. याशिवाय ट्रक व बसच्या एकेरी वाहतुकीसाठी ३७० रुपये द्यावे लागतील. स्थानिक खासगी वाहनांसाठी ३४० रुपयांचा मासिक पास देण्यात येणार आहेत.
 हलक्या वाहनांसाठीचे टोलचे दर
टोल नाका जुना दर नवीन दर
खेड शिवापूर ११५ १२०
चाळकवाडी १०५ ११०
हिवरगाव १०५ ११०