NC Times

NC Times

मुलगा हवा होता, तुला मुलगी का झाली, म्हणत विवाहितेचा छळ, सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल


नवचैतन्य टाईम्स  परभणी (प्रतिनिधी) आम्हाला मुलगा पाहिजे होता पण तुला मुलगीच झाली, असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. छोट्या मोठ्या कारणावरून टोमणे देऊन मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. विवाहितेच्या वडिलांनी सासरच्यांना समजावूनही सांगितले. पण फरक पडला नाही. त्यानंतर विवाहितेला त्रास आणखीन जास्त देण्यात आला. अखेर कंटाळून विवाहितेने आपल्याच घरातील लोखंडी आडुळाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विवाहित मुलीचे नाव प्रतीक्षा वशिष्ठ शिंदे असे आहे. प्रतिक्षाचा विवाह मांडाखळी तालुका जिल्हा परभणी येथील वशिष्ठ दतराव शिंदे यांच्यासोबत जुलै २०२० मध्ये झाला होता. लग्नामध्ये दोन लाख रुपये हुंडा आणि पाच ग्रॅम सोन्याची अंगठी देखील करण्यात आली होती. लग्न हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे सर्व मानपानासह लावून देण्यात आले. लग्नानंतर प्रतिक्षा सासरी गेली. सासरच्यांनी तिला सहा महिने चांगले नांदवले. त्यानंतर मात्र तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात सुरुवात केली.
लग्नानंतर नवरा बायकोमध्ये कुरबुर होत असते. म्हणून प्रतिक्षाच्या वडिलांनी सासरच्यांना समजावून देखील सांगितले. यादरम्यान प्रतीक्षाला मुलगी सानवी झाली. बाळंतपणानंतर प्रतिक्षाला तिच्या वडिलांनी सासरी नेऊन सोडले. सासरी गेल्यानंतर सासरच्यांनी प्रतिक्षाला त्रास देण्यास सुरुवात केली. आम्हाला मुलगा पाहिजे होता आणि तुला मुलगी झाली असे म्हणून छोटे-मोठे कारणे पुढे करून टोमणे देऊ लागले. प्रतिक्षा आपल्या मुलीकडे पाहून सर्व मानसिक आणि शारीरिक तास सहन करत होती.
सासरच्यांकडून होत असलेला त्रास प्रतिक्षाने फोनवरून आपल्या वडिलांना सांगितला. प्रतिक्षाचे वडील सासरी आले आणि त्यांनी सासरच्या सर्वच मंडळींना माझ्या मुलीला त्रास देऊ नका, अशी विनवणी देखील केली. पण तरीदेखील प्रतिक्षाला त्रास देणे काही कमी झाले नाही. त्यामुळे प्रतिक्षाला त्रास सहन झाला नाही. प्रतीक्षाने २० मार्च २०२४ रोजी राहत्या घरीच दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.
 प्रतिक्षाने आत्महत्या केल्याचे प्रतिक्षाच्या वडिलांना कळाले. तिच्या वडिलांनी तात्काळ मानवत सरकारी दवाखान्यात धाव घेतली. पण तोपर्यंत प्रतिक्षाचा जीव गेला होता. आपल्या मुलीला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे प्रतिक्षाचे वडील भगवान जोध यांच्या तक्रारीवरून पती वशिष्ठ, सासू सुवर्णमाला दत्तराव शिंदे यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.