NC Times

NC Times

रावेरमध्ये भावजयीविरोधात नणंद असा सामना? एकनाथ खडसेंची कोंडी


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी काय विकास केला, असा प्रश्न नणंद रोहिणी खडसे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहिणी खडसेंची तारांबळ उडाली. मतदारसंघात काय विकास झाला ते रोहिणी खडसेंना सांगता आलं नाही. पण भावजयीवर थेट टीका करणं त्यांनी टाळलं. तु्म्ही स्वत: मतदारसंघात या आणि काय विकास झाला ते पाहा, असं म्हणत त्यांनी प्रश्नांच्या कोंडीतून स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्या पु्ण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
रोहिणी खडसे यांनी आज पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. रावेर मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांना शरद पवार साहेबांची भेट घायची होती म्हणून ही भेट झाली असल्याचे सांगितले आहे. भेट झाल्यानंतर त्यांनी पत्रकारासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. जागावाटपाच्या चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांना वारंवार दिल्लीला जावं लागतंय. त्यांची अक्षरश: तारांबळ उडाली आहे, अशा शब्दांमध्ये रोहिणी खडसेंनी महायुतीवर टीका केली.
रावेरचा विकास झाला का? खासदार रक्षा खडसेंनी काम केलंय का?, असे प्रश्न पत्रकारांनी खडसेंना विचारले. विरोधी पक्षात असलेल्या भावजयीच्या कामाबद्दल प्रश्न विचारले जाताच नणंदबाई गडबडल्या. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांची तारांबळ उडाली. खडसेंनी प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं. पत्रकारांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही मतदारसंघात येऊन पाहा, तिथल्या मतदारांना विचारा, असं म्हणत खडसेंनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
तुम्हीदेखील रावेर लोकसभेच्याच मतदार आहात. त्यामुळे एक मतदार म्हणून तु्म्हाला काय वाटतं, असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी केला असता खडसेंची पुन्हा भंबेरी उडाली. आता मी पॉझिटिव्ह बोलले तरी तुम्ही बोलणार आणि निगेटिव्ह बोलले तरी तुम्ही बोलणार. त्यापेक्षा तुम्ही मतदारसंघात या, असं म्हणत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांमधून स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली. रोहिणी खडसेंना रावेरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.