NC Times

NC Times

अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार पुणे पोलिसांकडून कारवाई सुरु


नवचैतन्य टाईम्स पुणे  प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवर कायदेशीर कारवाई होणार असून, शहर पोलिसांनी आतापर्यंत दोन पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी देणाऱ्या पालकांनी सावधान राहावे, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.
वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग उल्लेखनीय असल्याचे दिसून आले आहे. मात्र, अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे या मुलांना अटकाव करण्यासाठी त्यांच्या पालकांना कायद्याच्या कचाट्यात ओढण्याचा मार्ग पोलिसांनी स्वीकारला आहे. त्यानुसार पर्वती पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात अल्पवयीन मुलांनी वापरलेल्या तीन दुचाकींच्या मालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दोन दुचाकी पालकांच्या नावावर होत्या, तर एक दुचाकी अन्य एका व्यक्तीच्या नावावर होती. या प्रकारानंतर पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला असून, तोडफोडीच्या गुन्ह्यासह वाहतूक नियमभंगप्रकरणातही अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाकाबंदीत सापडले अल्पवयीन दुचाकीस्वार
धूलिवंदनच्या दिवशी मद्यपान करून अनेक जण वाहन चालवितात, असे यापूर्वी दिसून आले आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची सूचना पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली होती. त्यानुसार सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड कॉलेज येथील तुकाईनगर सर्कल येथे पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. या वेळी दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना आढळली. त्या मुलांकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नव्हता. या मुलांना ताब्यात घेऊन, पोलिसांनी त्यांच्या पालकांविरोधात मोटार वाहन कायदा, १९८८च्या कलम ३, ५, १९९ (अ) नुसार गुन्हा दाखल केला.
कायद्यानुसार शिक्षा काय?
- मोटार वाहन कायदा, १९८८चे कलम ३, ५, १९९ (अ)मध्ये तरतूद.
- २५ हजार रुपये दंड, तीन वर्षांचा कारावास, वर्षभर वाहन जप्ती.
- अल्पवयीन मुलांना २५ वयापर्यंत लायसन्स न देण्याची तरतूद
अल्पवयीन दुचाकीस्वारांना अटकाव करण्यासाठी त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्या अंतर्गत दोन अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांवर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पालकांनी सजग राहावे आणि आपल्या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे.- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त