NC Times

NC Times

माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस - मा.सौ.सुनेत्रा पवार


नवचैतन्य टाईम्स बारामती प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात चर्चा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवारांची आज शनिवारी घोषणा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काही मिनिटातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
 उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आज महायुतीच्या माध्यमातून मला बारातमती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्याचे आभार मानले.                                                              सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात होणाऱ्या या लढतीबाबत सुनेत्रा पवार म्हणाल्या, ही लढत जनतेने हातात घेतली आहे आणि ही जनतेची लढत आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढणार असून बारामतीप्रमाणेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यावर आपला भर असेल असे त्या म्हणाल्या.
अजित दादांनी जी भूमिका घेतली आहे ती राष्ट्रासाठी आहे आणि राष्ट्र प्रथम येते त्यामुळे ही कौटुंबिक निवडणूक नाही तर राष्ट्राची निवडणूक आहे. मतदारसंघात महिला सक्षमीकरण, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पाण्याचा प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या. लोकांचा उत्साह पाहिल्यानंतर लोकांना बदल हवा आहे, असे वाटते असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांचा आतापर्यंतचा प्रवास
सुनेत्रा पवार यांची माहेरची पार्श्वभूमी राजकीय आहे. धाराशीवचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. विवाहानंतर त्या पवार घराण्याच्या सून म्हणून आल्या. बारामतीत एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्या गेली दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी काटेवाडी गावचा कायापालट केला.                        राष्ट्रपती पुरस्कार गावाला मिळवून दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर त्या कार्यरत आहेत. फोरमच्या माध्यमातून त्यांनी बारामती व दौंड तालुक्यात जलसंधारणाची भरीव कामे केली आहेत. याशिवाय दरवर्षी नेत्रतज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाने यांचे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर त्या आयोजित करतात. या शिबिराचा आजवर हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या चेअरमन आहेत. याशिवाय विद्या प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र स्टेट ॲग्री ॲन्ड रुरल टुरुझम फेडरेशन आदींवर विश्वस्त म्हणून काम पाहतात. त्यांना आजवर मानाच्या विविध सहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.