NC Times

NC Times

एक विचार हुताशनी पौर्णिमेच्या महतीसाठी एक विचार , दृष्ट प्रवृत्ती निर्दलनासाठी, एक विचार पंरपरा जोपसण्यासाठी,जतन व संवर्धन करण्यासाठी


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी (ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
हुताशनी पौर्णिमा  
फाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा -  हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळी शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. कारण प्रल्हाद मरेल व ती जिवंत राहील. पण झाले उलटे होलीका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पोटवून आनंद व्यक्त करतात. शिवांनी मदनाला जाळले तोही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून होळी पेटवतात. तसेच ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिला. तेव्हा ती निघून गेली. आजही समाजात ‍वीभत्स बोलणारी, शिक्षा द्याव्यात असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा धर्मशास्त्राने या दिवसापुरती दिली आहे. जशी घाण पाण्याला वाट करुन द्यावी लागते तसाच हा प्रकार आहे. विषवृत्तावर सूर्य येतो तो 21 मार्च रोजी. याच्या जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो.यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे. देवालयासमोर, मोकळ्या मैदानात होळी लावावी. होळी लावल्यावर पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात.
दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.
होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळी चा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अश्या ठिकाणी जातात. आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते. वज्र ला होळी च्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. हि उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खासकरून वज्र या जातात. बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते, आणि नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात.

मध्य भारत तसेच महाराष्ट्रात रंग पंचमीला अधिक महत्त्व आहे. इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात ” बुरा ना मानो होली है !”
उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि इथे होळी ची एक वेगळीच शान आहे. होळी च्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून , ह्या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते तसेच नाच गाण्या सोबत हि होळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात. अश्या ह्या होळी ची तयारी लोक १५ दिवस अगोदर पासूनच करतात. काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळी चा एक भाग आहे. भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूकभूल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते.
होळी च्या दिवशी घरी बरेच पक्वान्न केली जातात. स्वादाने भरलेल्या ह्या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.
मानवी जीवनात सदैव नैराश्य दूर सारत आनंद वाटत नवउर्जा प्रदान करतात ते भारतीय संस्कृतीचे निसर्गाशी नाते सांगत सारेच सण. आजचा होळीचा हा सण अत्यंत महत्वाचा.
 फाल्गुन पौर्णिमेला केसरीया रंगाच्या पळस फुलाचे बहरलेले निसर्ग सौंदर्य आणखी खुललेय. याचा आनंद लुटला जाणार मनसोक्त गायनाने.. श्रवणानंदाने. हिवाळ्यातील थंडीला दूर सारणारी आज होळी. महाराष्ट्रात घरोघरी छोट्या होळीचा होम करुन विधीवत पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. निसर्गात पसरलेल्या रोगट जीवजंतूंचे या होळीत दहन होणार.
जेव्हा असुरी शक्तीचे निर्दालन होते तेव्हाच आनंद निर्माण होतो. असुरी प्रवृत्तीत असलेला अहंकार नातेही विसरतो.
कोकणवासियांचा तर फार मोठा सण. कोकणवासी अत्यंत समजदार. नैसर्गिक संकटाशी लढून स्वकष्टाने.. विनातक्रार.. आत्मनिर्भर होत आनंदाने जगणारे, अशी कोकणची ख्याती.    
निसर्गरम्य हिरव्यागार कोकणात १५ दिवस होळी सणाचा आनंद वेगवेगळ्या खेळाने लुटल्या जाणार. घरे पाहुण्यांनी भरलीत. त्यांच्या आगमनाने.. भेटीने घरात आनंदीआनंद आहे. सारवलेल्या घराच्या अंगणी रंगीबेरंगी रांगोळी काढणाऱ्यां भगिनींची आज लगबग. त्या पैठणी परिधान करुन नटूनथटून सौभाग्यलंकारासह ग्रामदेवतेचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार.
 जीवनात समस्या उदभवल्या तर निराकरणासाठी सांगणार तरी कुणाला.. मग गाऱ्हाणे मांडले जाते ते होळीपूढे. इच्छापूर्ती झाली तर काही तरी दान देण्याचे वचन.. नवस बोलला जातो. इच्छापूर्तीनंतर हा नवस पूर्ण केला जातो.
आपल्या घरी ग्रामदेवतेची पालखी कधी येणार, त्याचे स्वागत कसे करायचे याच्या तयारीत विश्वातील चिंतापासून मुक्तता देणारा हा आनंददायी होळीचा सण.
   होळी ला घ्यायची काही काळजी |                              १) होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानाना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.
  २) तसेच आजकाल भांग मध्ये देखील बरेच अन्य नाशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अश्या पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे.
 ३) चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये.
 ४) घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा कारण अश्या सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते.
५) सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.
🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
     🔆🔅 रामकृष्णहरी 🔅🔆
सौ.सरस्वती ताई