NC Times

NC Times

शिर्डीत तरुणावर भरदिवसा गोळीबार शहरात दहशतीचे वातावरण


नवचैतन्य टाईम्स शिर्डी (प्रतिनिधी)-सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांची नगरी आता वाढत्या गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत येत आहे. दरम्यान गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर शिर्डीकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान साईबाबा मंदिर आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या जवळच झालेल्या या गोळीबारामुळे जरी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी साईनाथ रवींद्र पवार आणि त्याचा भाऊ सचिन पवार बसले होते. तेवढ्यात तेथे संपत शंकर वायकर आणि त्याचा अनोळखी साथीदार असे दोघे जण मोटारसायकलने आले. संपत वायकर आणि त्याचा साथीदार यांनी साईनाथच्या दिशेने येऊन संपत वायकर याने त्याचे कमरेमधून गावठी कट्टा काढला. नंतर साईनाथला म्हणाला की, तुला एकदाच संपवून टाकतो. असे म्हणून त्याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने साईनाथच्या डोक्याच्या दिशेने गावठी कट्टाने फायर केला. तो फिर्यादीने चुकवला.
त्यानंतर त्याने पुन्हा आमच्या दिशेने फायर केला, परंतु तो फायर झाला नाही. फिर्यादीच्या सांगण्यावरुन शिर्डी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मंदिर परिसरामध्ये एका चहा विक्रेत्यावर काही टवाळखोरांनी चाकूचे वार केले होते. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर अशा अनेक छोटे-मोठे प्रकार घडले आहे. आता तर चक्क पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शिर्डीत कायदा सुव्यवस्था राहिली की नाही? पोलीस प्रशासन करत काय? असाही प्रश्न सामान्य साई भक्तांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
 गेल्या एक दीड महिन्यात शिर्डीत गॅंगवॉर सुरू असून साई मंदिराच्या लगत परिसरामध्ये कोण कोयते घेऊन पळतय, कोण तलवारी घेऊन पळतंय ,गोळीबार होतंय ही वाढती गुन्हेगारी शिर्डीसाठी चिंतेची बाब आहे. शिर्डीचे नागरिकांसह येणारा साई भक्त येथे सुरक्षित नाही. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर ठोस कारवाई होत नसल्याने त्यांची मजल वाढत चालली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, हीच आमची मागणी असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.
साईबाबांच्या पवित्र नगरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदे सुरू आहे. अवैध दारू विक्री, मटका व जुगार अड्डे, बिंगो, गांजा आणि गुटखा विक्री जोरात सुरू असून अनेक हॉटेल्स मध्ये नको ते कृत्य घडत असल्याची चर्चा आहे. तसेच छोटे मोठे चोऱ्या तर नित्यच घडत आहे.हे सर्व अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत का? असाही प्रश्न नागरिकांना पडला असून पोलीस त्यांच्यावर ठोस कारवाई का करत नाही असाही सवाल उपस्थित होत आहे? तसेच अवैध धंद्यानमुळेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना बळ मिळत असल्यामुळे पोलीस प्रशासन हे सर्व आटोक्यात आणण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.