NC Times

NC Times

वाडीत भरदिवसा गुन्हेगाराला निर्घृणपणे संपवलं


नवचैतन्य टाईम्स  नागपूर (प्रतिनिधी)- नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्यांतर्गत भरदिवसा एका गुन्हेगाराची त्याच्याच साथीदाराने चाकूने भोसकून हत्या केली. मृत लिखीत उर्फ लकी आडे (२८) हा साई नगर, दाभा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तर आरोपी सागर घोष (२६) हा सुद्धा साई नगर येथील रहिवासी आहे.
 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लकी आडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर खून, प्राणघातक हल्ला असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला गांजा ओढण्याचीही सवय आहे. तो वडिलांसोबत ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लकी हा टेकडी वाडी जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी असलेला त्याचा मित्र विकी लोखंडे (३४) याच्या घरी दारू आणि गांजा पिण्यासाठी आला होता. तेथे तो विकी आणि मित्र आरुष उर्फ सागर घोष (२६) याच्यासोबत बसून दारू आणि गांजा पिऊ लागला.
यादरम्यान सागरचा लकीसोबत काही कारणावरून वाद झाला. यानंतर सागरने लकीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. लकीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून विक्कीने कॉलनीत धाव घेत हत्येची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि घटनेचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर सागर उर्फ आरुष घोष याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर टाटा एस गाडी चालवतो. मात्र, या हत्या प्रकरणातील विक्की लोखंडे याची भूमिकाही संशयास्पद असून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.