NC Times

NC Times

धक्कादायक लव्ह मँरेजला मदत करणे बेतले जीवावर,डोक्यावर बोलेरो घालून तरुणाची हत्या


नवचैतन्य  टाईम्स वाळूज महानगर(प्रतिनिधी)  दुचाकीवर वडिलांसोबत बँकेतून पैसे काढण्यासाठी जात असलेल्या युवकाच्या गाडीला धडक देऊन त्याच्या अंगावर तीन-चार वेळा जीप घालत भर रस्त्यात त्याचा खून करण्यात आला. हा प्रकार शेंदूरवादा-सावखेडा (ता. गंगापूर) रस्त्यावर गुरुवारी (२८ मार्च) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. पवन शिवराम मोरे (वय २४, रा. जुने ओझर, ता. गंगापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 पोलिसांनी सांगितले, की पवन मोरे शेतकरी असून, त्याचे पुढील आठवड्यात लग्न होते. लग्नकार्यासाठी बँकेतून पैसे काढून आणण्यासाठी पवन दुचाकीवरून निघाला होता. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून पिता-पुत्र जात असताना भरधाव वेगात बोलेरोने (क्रमांक एमएच २०, ईवाय ०६४५) पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
 पवनच्या अंगावर घालण्यात आलेल्या गाडीत संशयित सचिन भागचंद वाकचौरे (रा. धूपखेडा ता. पैठण) व इतर पाच जण असल्याचा दावा पवनच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी शिवराम मोरे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने करीत आहेत.
 गाडी सोडून दुचाकीवरून पलायन
पवन मोरे याच्या अंगावर गाडी घातल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात मारेकऱ्यांची गाडी खड्ड्यात जाऊन अडकली. ती बाहेर काढण्याचा प्रयत्न गाडीतील व्यक्तींनी केला. मात्र, गर्दी जमा होऊ लागल्याने पवनचे मारेकरी दुचाकीवरून पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले.
 प्रेमप्रकरणातून खून?
पवन याच्या मामाचा मुलगा विशाल नवले याने सचिन व विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. या दोघांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. या लग्नात वाघचौरे आणि नवले कुटुंबाचे नातेवाईक होते. वाघचौरे यांच्या बहिणीला पळवून नेण्यात आणि प्रेमविवाहात पवन मोरे याने सहकार्य केल्याचा संशय सचिन वाघचौरे आणि त्याच्या भावाला होता. या रागातून सचिन व त्याच्या साथीदारांनी पवनचा खून केला, असा दावा नातेवाइकांनी केला.