NC Times

NC Times

मनसे भाजप युती होणार? राज ठाकरे दिल्लीला रवाना


नवचैतन्य  टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन) : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी नरेंद्र मोदी अमित शाहांना राजकीय क्षितीजावरून हटवा, अशी भूमिका घेऊन निघालेले मनसेप्रमुख राज ठाकरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकरीकरिता त्याच भाजप नेतृत्वाशी बोलणी करण्याकरिता राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही महाराष्ट्रातील काही जागा कठीण जात आहेत, असा अंतर्गत सर्व्हेचा अंदाज असल्याने राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांना सोबत घेऊन विरोधी पक्षाला आणखी दुबळे करण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्व करताना दिसून येत आहे.
गेली दीड दशके मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करून गेल्या दोन वर्षापासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. परंतु त्यांच्या उत्तर भारतीयांच्या विरोधातील भूमिका ही राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला पटत नाही. त्याचमुळे भाजप-मनसे युतीच्या फक्त चर्चा व्हायच्या, प्रत्यक्षात युती होत नव्हती. मात्र सध्याच्या लोकसभा निवडणुकांचं एकंदर चित्र पाहिल्यास 'युती व्हावी' ही दोन्ही पक्षांची गरज आहे. त्याच गरजेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजप नेतृत्वाशी चर्चा करण्याकरिता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीत आहेत. राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर तिघेही भाजप मुख्यालयात किंवा अमित शहा यांच्या निवासस्थानी जातील. तिथे राज ठाकरे यांची भाजप नेतृत्वाशी निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा होईल, अशी प्राथमिक माहिती कळतय.
 दुसरीकडे काही जागांवरून भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे. अशा जागांवर मनसेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे करून राज ठाकरे यांना राज्यात फायरब्रँड प्रचारक म्हणून सभा घ्यायला सांगून त्यांचा आवश्यक फायदा करून घेण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस आहे, अशीही प्राथमिक माहिती कळतीये.
 बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
मनसेचा महायुतीत समावेश झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजप आणि शिंदेंचा दावा असलेल्या ठाण्यात देखील मनसेचा उमेदवार देण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.