NC Times

NC Times

महिलांसाठी खुशखबर आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू, कसा होणार फायदा




नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(संतोष पाटील) गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या राज्याच्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून, आज, शुक्रवारपासून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली.
महिला दिनाच्या निमित्ताने आदिती तटकरे यांनी खास बातचीत केली. या वेळी त्यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाची घोषणा केली. त्या म्हणाल्या, ‘महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून, त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत मोफत आरोग्यतपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. शिवाय, शिक्षण, कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये १०० टक्के नोंदणी होईल आणि ती टिकून राहील, यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याबरोबरच कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांविरोधातील सर्व प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अतंर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींसाठी नेतृत्व, नियोजन, अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना धोरणात करण्यात आली आहे.’
धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी धोरणाच्या अंमलबजावणीची प्रगती मोजण्याचे निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारच्या विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, त्याचा समन्वय कसा राहील, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय विशेष कृतीदल आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.                                              शक्ती कायद्यासाठी प्रयत्नशील'     महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त असलेल्या शक्ती विधेयकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केंद्राशी चर्चा केली. याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.