NC Times

NC Times

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पतंगे या तरुणाची आत्महत्या


नवचैतन्य टाईम्स हिंगोली (प्रतिनिधी ) : जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात असलेल्या कांडली येथील चंद्रकांत अजबराव पतंगे (वय- २६) या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वारंगा फाटा शिवारात असलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन आपल जीवन संपवले.
 यावेळी त्यांने चिठ्ठी देखील लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. या चिठ्ठीमध्ये असे लिहिले आहे की,
 
प्रिय आईस,  आई आज मी तुला आणि वैभवला सोडून दूर जात आहे. तू बाबा गेल्या नंतर खूप काही केलस माझ्यासाठी "मी शिकून मोठे व्हावे हे स्वप्न मी आरक्षणामुळ पूर्ण करू शकलो नाही. काल आचारसंहिता लागल्यापासून मला कळून चुकलंय हे सरकार आरक्षण देणार नाही. आई मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही मला माफ कर. वैभवला संभाळ. अशी चिठ्ठी लिहून या तरुणाने जीवन संपवले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातल्या काढली येथील चंद्रकांत पतंगे हा वारंगा फाटा येथे राहत होता. त्याचा एक भाऊ पुण्यामध्ये कामाला असल्याचे समजते. वडील नसल्याने त्यांच्या आईवर ही जबाबदारी होती. आईने मुलांना शिकवले मुलांना संगणक शिक्षक घेऊन तो कांडली ग्रामपंचायत येथे ऑपरेटर म्हणून कामाला होता. तर काही काळ विद्यार्थ्यांचे क्लासेस देखील तो घ्यायचा. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सकाळी घराच्या बाहेर पडलेला असताना त्याने एका शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
उशीरापर्यंत चंद्रकांत हा घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली, तेव्हा वारंगा फाटा शिवारातील एका शेतात विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींवार ,उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने घटनास्थळी घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. यावेळी मयत चंद्रकांत यांच्या खिशात टाईप केलेली चिठ्ठी आढळून आली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपींवार यांचे पथक करीत आहे.