NC Times

NC Times

नवविवाहिता सिनेमा पाहुन परतताना अंतोरे पुलावरुन खाली पडल्याने जागीच मृत्यू


नवचैतन्य टाईम्स रायगड (संतोष पाटील) कोकणातील रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वरेडी गावातील एक नवविवाहिता रात्री आपल्या पतीसोबत पेणमधील मोरेश्वर सिनेमा गृहातून परतत होती. त्याच वेळी झालेल्या एका दुर्घटनेत तिने आपला जीव गमावला. स्नेहा प्रशांत पाटील असे या २० वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. पती देखत स्नेहाने आपले प्राण गमावल्याने पेण परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि तिचे पती प्रशांत पाटील हे दांपत्य दिनांक ९ मार्च रोजी पेणमध्ये रात्री १ वाजण्याच्या सुमारास सिनेमा पाहून वरेडी येथील घरी अंतोरे पुलावरून दुचाकीवरून परतत होते. त्याच वेळी पुलावर प्रशांतच्या डोळ्यात कचरा गेल्याने स्नेहा दुचाकीवरून खाली उतरली आणि मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने आपल्या पतीच्या डोळ्यात काय गेले हे पाहत असतानाच तिचा अचानक तोल गेला. ती पुलावरून खाली पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी पती प्रशांतने तिला हात दिला. त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात प्रशांत हे देखील दुचाकीसह खाली पडले.
त्यावेळी तिथे आरडाओरडा पाहून काही स्थानिक नागरिक जमा झाले. स्थानिकांनी प्रशांत पाटील यांच्यासह दुचाकी वर काढली. मात्र रात्रीचा अंधार आणि पाण्याचा अंदाज न आल्याने स्नेहा दिसून आली नाही. तब्बल २ तास शोध घेतल्यानंतर स्नेहाचा मृतदेह हाती लागला. याबाबत माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांच्यासह पेण पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्नेहाचे शव पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी स्नेहाला मृत घोषित केले. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र या धक्कादायक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.