NC Times

NC Times

आमदार रवींद्र वायकरांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)मुंबईतील जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांनी मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाकडे पाहून हा निर्णय घेतल्याचं रवींद्र वायकर यांनी सांगितलं. रवींद्र वायकर यांना यावेळी ईडी चौकशी आणि किरीट सोमय्या यांच्याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ईडीच्या संदर्भातील प्रश्नाला वायकर यांनी उत्तर दिलं. तर, किरीट सोमय्या यांच्याबाबतच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत अधिक भाष्य करणं टाळलं. ईडीचा प्रश्न येताच काय घडलं?
पत्रकारांनी रवींद्र वायकर यांना ईडीच्या चौकश्या चालू होत्या, तुम्ही बऱ्याच वर्षांपासून चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकला होता, त्यापासून बाजूला होण्यासाठी हा निर्णय घेतलाय का असा प्रश्न विचारला. यानंतर शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या. रवींद्र वायकर यांनी ज्या काय यंत्रणा असतील त्यांना जे सहकार्य हवं ते दिलेलं आहे. कोर्टात देखील काय होतंय ते तुम्हाला कळून आलेलं आहे. यंत्रणांना सहकार्य दिलेलं आहे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जातं, असं वायकर म्हणाले. असमान निधी वाटपाच्या प्रश्नावर कोर्टात गेलो होतो, सत्तेत असतात त्यांना अधिक फंड मिळतो, असंही ते म्हणाले.
किरीट सोमय्यांच्या प्रश्नावेळी काय घडलं?
भाजपच्या अनेक नेत्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता, तुम्ही भाजप नेते आणि किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार का असा प्रश्न पत्रकारांनी रवींद्र वायकर यांना विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजू सांभाळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरे ते जाऊ द्या आता कशाला काढताय असं म्हटलं. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेनेचा जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. ते आता पॉझिटिव्ह बोलतात, त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मला त्यांनी जी कामं करायची आहेत त्याची पत्र दिली आहेत. एकाच दिवशी सगळं विचारत आहात, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाजू सावरली.