NC Times

NC Times

चळवळीची वाट दाखवणारे नंदकुमारजी नांगरे आमदारकीच्या प्रचारातून ,माझा डेमोक्रॅटिक पक्षातील प्रवास


नवचैतन्य टाईम्स सांगली(प्रतिनिधी)  
शिराळा वाळवा मतदारसंघात राजकारणाचे वातावरण तापले होते, बलाढ्य शक्तीविरुद्ध नंदकुमारजी नांगरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाजाला आमदार नंदकुमारजी नांगरे यांच्या रूपाने मिळावा यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमारजी कांबळे यांनी नंदकुमारजी यांना आमदारकीचे तिकीट दिले होते. त्यावेळी मोजकेच कार्यकर्ते घेऊन नंदकुमारजी कासेगावात प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मी शिवसेनेचा कडवट कार्यकर्ता होतो. जहालपणा रक्तातच भिनलेला होता. त्यांच्या प्रचाराची बैठक चालू असताना मी उर्मटपणाने त्यांना काही प्रश्न केले होते. बैठक संपल्यावर त्यांनी माझी कासेगाव पोलीस स्टेशनच्या मागे भेट घेतली .आणि गालात हसून माझ्या पाठीवर हात ठेवला. अधून मधून फोनही करत राहिले. एका भीमसैनिकाची आणि एका शिवसैनिकाचे केव्हा मैत्रीत रूपांतर झालं ते आम्हाला कळलच नाही. इस्लामपूरच्या स्टॅन्डवर आमची उठ बस व्हायची, मी कायम भगवा नाम ठासून, दाढी राखून, मिशीला पीळ देत असायचो.शाहू फुले आंबेडकरांचे विचार ते माझ्या डोक्यात पेरत होते. एके दिवशी त्यांनी प्रा. सुकुमारजी कांबळे यांची भेट  घालून दिली. डेमोक्रॅटिक पक्षाची विचारधारा मला समजावून दिली .आणि कासेगावात डेमोक्रॅटिक पक्षाचा मेळावा घेऊन माझी तालुका अध्यक्षपदी निवड केली. पुढे जिल्हा संपर्कप्रमुख पद देऊन मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली .असे सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी देणारे नंदकुमारजी नांगरे यांचा आज वाढदिवस त्या निमित्त लेख लिहिताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. पण नंदकुमारजीं नांगरे आणि नितीनभाऊ बडेकर यांच्या दोस्तीचे गमक अजूनही कुणाला उमगलेच नाही. डेमोक्रॅटिक पक्षात असताना अनेक आंदोलने केली. कितीही सुख दुःख आले तरी विविध माध्यमातून आम्ही बोलतच राहिलो. काही ठिकाणी त्यांचे आणि माझे वैचारिक मतभेद होत असतात .असाच एक गमतीदार प्रसंग घडला होता.त्यावेळीही मी त्यांचा ऐकलंच नाही .आणि अजूनही ऐकत नाही. असा  एक प्रसंग सांगावासा वाटतो.म्हणजे नव्या कार्यकर्त्याला नेत्यावर प्रेम कसं करावं यांचे उत्तम उदाहरण मिळेल .एक दिवस डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने अवैद्य धंद्याच्या विरोधात मी आवाज उठवला होता. काही पोलीस ठाणे या प्रकाराने जेरीस आले होते. माझ्यावर दबाव टाकून मला भीती घालण्याचा प्रयत्न करत होते ,एका पोलीस स्टेशन मध्ये एक अधिकारी फारच उर्मट बोलत होता. नंदकुमारजी नांगरे यांच्याबददल माझ्या जवळ ऐकेरी शब्द वापरत होता. त्यावेळी माझे डोळे लालबुंद होत होते. तो मला म्हणाला .नंद्या माझा मैतर हाय, हे त्याचे शब्द ऐकताच माझी तळपायाची आग मस्तकात गेली. आणि माझ्या तोंडून शब्द निघाला. एका बुक्कीत मेंदू बाहेर काढीन. आता ते माझे नेते आहेत. माझ्यासमोर त्यांना साहेब म्हणायचं. तुमची मैत्री तुमच्याजवळ. तो अधिकारी नंदकुमारजी नांगरे यांना तसं सांगत गेला. त्यावेळी नंदकुमारजी त्यांना म्हणाले सगळे कार्यकर्ते माझे ऐकतील, पण तो कार्यकर्ता माझ्या ऐकत नाही. मला कोण काय बोललं तर लगेच बिथरतो.त्याला आवरण अवघड होत. कालांतराने माझा राग शांत होत गेला. आज माझ्या हातात लेखणी आहे ती त्यांच्याच मुळे. आज खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्याची प्रेरणा मिळते ती त्यांच्याचमुळे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून नंदकुमारजी नांगरे यांना हार्दिक शुभेच्छा संपादक नितीनभाऊ बडेकर