NC Times

NC Times

संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)   भावार्थ अनुभवामृत ग्रंथातील श्लोक निरूपण:-

क्रमश:
||श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजकृत श्लोक ५वा||

मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये |
क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ||५||

अन्वय:-
मूलाय अग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये
क्षीण अग्र मूल मध्याय पूर्णाय शंभवे नमः (अस्तू)

अर्थ:-
जो परमात्मा जगताच्या आदी म्हणजे सुरवातीच्या काळात आहे तोच परमात्मा जगताच्या स्थितीकालातही आहे आणि तोच परमात्मा जगताच्या शेवटी म्हणजे अंतःकालातही आहे. हे संपूर्ण जगत परमात्मस्वरूपच आहे. याला परमात्म्याचे विवर्त म्हणजे अध्यास आणि मायेचा परिणाम असे म्हटले जाते. म्हणजेच या जगताचे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश हे तीनही भाव परमात्म स्वरूपावरतीच प्रगट होतात. परंतु परमार्थाच्या दृष्टीकोनातून पाहिले असता, पारमार्थिक सत्तेत राहणाऱ्या त्या परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी जगताच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचा अत्यंत अभावच आहे. म्हणजेच हे तीनही भाव परमात्म्याच्या ठिकाणी प्रगट होऊनही परमात्मस्वरूपात ते कधीच झाले नाहीत. अशा आपल्या विलक्षण महिमेने परिपूर्ण असलेल्या सुखस्वरूप शंभू म्हणजे त्याच्या कृपेने सुख प्राप्त होते असा, जो पूर्ण अधिष्ठानस्वरूप जो परमात्मा आहे त्याला माझा नमस्कार असो. म्हणजे जो परमात्मा मूलस्वरूपात आहे, त्याला नमस्कार. जो मध्यस्वरूपात आहे, त्याला नमस्कार. जो अग्रात आहे, त्याला नमस्कार. ज्याच्या ठिकाणी जगत प्रतीतीला येते, त्या परमात्म्याला नमस्कार. तसेच ज्या परमात्म्याच्या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे तिन्हीही संभवत नाहीत जो त्याहून पूर्ण अलिप्त आहे, त्या परमात्म्याला नमस्कार. अशा एकच असणाऱ्या परमात्म्याच्या अनेक रूपाने नटलेल्या, शंभू स्वरूपाला पुन्हा पुन्हा नमस्कार ||५||
__गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित🙏🏻🌸🌷
रामकृष्णहरि🙏🏻🌸🌷