NC Times

NC Times

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धाप्पा खांडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा: भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी




नवचैतन्य टाईम्स सांगली (प्रतिनिधी) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेला स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्ता सिद्धाप्पा खांडेकर याच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याबरोबरच माहिती अधिकाराचा वापर करून तो उमराणी येथील विविध राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांना वैयक्तिक त्रास देत असल्याने त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्याचा गेले अनेक वर्षे लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धाप्पा खांडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष उदयसिंह रजपूत यांनी जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
 भूमिपुत्र शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सिद्धाप्पा खांडेकर हा जत तालुक्यातील उमराणी येथील मूळचा रहिवासी आहे. गेली अनेक वर्षे तो मिरजेत वास्तव्यास असून मिरजेत राहून त्याने मालमत्ता जमा केलेली आहे.अत्यल्प पगार असताना गावाकडे जमीन खरेदी,बॅंकेत गुंतवणूक अशा पद्धतीने मालमत्ता गोळा करणाऱ्या सिद्धाप्पा खांडेकर याने खासगी रुग्णालयात तो काम करीत असलेल्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषध आणून देत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून गोरगरिबांची फसवणूक केली आहे. शिवाय मिरजेत राहून गावाकडील राजकीय सत्ताधारी मंडळी प्रशासनाचे अधिकारी यांना वारंवार माहितीच्या अधिकाराखाली त्रास देणे चालू ठेवले आहे. माहिती अधिकाराचा वापर करून एकीकडे आपण स्वच्छ चारित्र्याचे असल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे याच माहिती अधिकाराचा वापर करून स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायतीकडे गायरानातील जागा मागणी करायची, ग्रामपंचायतीने उभारलेल्या व्यापारी संकुलनातील गाळ्यांची मागणी करणे अशा प्रकारचे उद्योग सिध्दाप्पा खांडेकर करीत आहे. शेत जमिनीच्या वगैरे प्रकरणातून भावकीत भांडणे लावणे, पै पाहुण्यांमध्ये तेढ निर्माण करणे आणि स्वतःची पोळी भाजून घेणे अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्या सिद्धाप्पा खांडेकर याच्याच बुडाखाली मोठा अंधार असून सिद्धाप्पा खांडेकर याने अनेक वर्षांपूर्वी मिळवलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सखोल चौकशी करून सिद्धाप्पा खांडेकर याच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी उदयसिंह राजपूत यांनी केली आहे. सिद्धाप्पा खांडेकर हा शारीरिक दृष्ट्या कायमस्वरूपी अपंग नसताना त्याने दिव्यांग सर्टिफिकेट कोणत्या आधारावर मिळवले आहे याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिध्दाप्पा खांडेकर याने रात आंधळेपणामुळे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र गेले अनेक वर्षे सिद्धाप्पा खांडेकर हा एका खाजगी रुग्णालयात रात्रपाळीला सतत काम करीत आहे. मग रात्रपाळीला गेल्या अनेक वर्षे काम करणारा माणूस रात आंधळा कसा काय असू शकतो? असा सवाल करून सिद्धाप्पा खांडेकर याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर मिळवलेल्या सर्व सोयी सुविधा सवलती बंद करून त्याचे अपंग प्रमाणपत्र जप्त करून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी उदयसिंह रजपूत यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जतचे तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.