NC Times

NC Times

शहरीकरणाबरोबरच ग्रामीण भागाचा ही परिपूर्ण विकास महत्त्वाचा


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)आपल्या देशाच्या अर्थकारणात आणि समाजकारणात महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामीण भागाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.हा आजचा  विषय मी आपल्या समोर मांडणार आहे. आणि म्हणूनच मला अतीव आनंद होत आहे
 कारण मी ही ग्रामीण भागाची निगडित एक तरुण आहे. आपले राज्य हे शेतीप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण भागातील शेती व शेतीवर आधारित इतर उद्योग, सहकार क्षेत्र आणि राजकीय पार्श्वभूमी हीच आपल्या राज्याची खरी ओळख आहे. याचा आपल्या सर्वांना निश्चितच सार्थ अभिमान आहे. आपण जरी एकविसाव्या शतकात प्रगतीची उत्तुंग झेप घेत आहोत तरीही ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे एक निर्विवाद सत्य आहे. आज बदलत्या जीवनशैलीमध्ये आपली बहुरंगी ग्रामीण संस्कृती टिकून ठेवण्याची जबाबदारी असलेला ग्रामीण वर्ग आजही बहुसंख्येने दिसत आहे. आजच्या घडीला वाढत्या शहरीकरणातील चोखंदळ असलेला नव्या पिढीतील युवक वर्ग आज ग्रामीण भागाकडे आकर्षित झालेला दिसून येत आहे. शेतीवर आधारित 
 उद्योग, शेती पर्यटन, नवनवीन उद्योगांसाठी लागनारा,   कामगार वर्ग, प्रदूषण मुक्त वातावरण, या सर्वांमुळेच आज ग्रामीण भागाकडे वाढते आर्थिक क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे, परंतु हे सर्व चालू असताना एक परिपक्व समन्वय साधने तितकेच महत्त्वाचे आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करताना पहिला प्रयत्न हा ग्रामीण भागातून झाला. आपल्या देशाला ज्या थोर महापुरुषांची पार्श्वभूमी आहे ते विशेषतः ग्रामीण भागाशी निगडित आहेत तेव्हा ग्रामीण भागाचे महत्त्व आपल्या सर्वांना कळलेच असेल.
    तेव्हा आजच्या विषयाकडे आपण वळूया. आपले ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर, ही केवळ शासनाची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची हे सर्वांनी प्रथम जाणून घ्या.आपले गाव स्वच्छ निर्मळ करायचे असेल तर काही समस्यांचा प्रश्नांचा आपणास सामना करावा लागेल. पण त्याच वेळी सूर्योदयाच्यावेळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर आला व सर्व परिसर प्रकाशाने उजळून गेले तेव्हा मनात एक प्रश्न आला. आपले गाव स्वच्छ निर्मल होईल? तेव्हा बाप्पाकडे एक साकडे घालावे असे वाटते की माझे स्वप्न पूर्ण होऊ दे. त्या वेळी रामदास स्वामींची एक ओळ मनात आली ती म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. तेव्हा प्रयत्न हा करावाच लागेल आणि तोही सांघिक पणे. परंतु गावातील पोरापासून ते थोरापर्यंत काम म्हणजे कंटाळा येतो. गावातील पोरांचे खेळण्याकडे,  जेवढे लक्ष असते तेवढेच काम टाळण्याकडे असते. वास्तविक पाहता माणसाची प्रवृत्ती ही सकारात्मक कामाकडे दुर्लक्ष तर याउलट वाईट काम, नकारात्मक हिताचे काम करण्याकडे जास्त कल असतो. थोर संतांनी आपल्या शिकवणीतून आपणास सांगितले आहे की प्रयत्नाने कष्टाने जगात काहीही अशक्य नाही. प्रयत्नं आर्थी परमेश्वर हे बोधवाक्य बरेच काही शिकवून जाते.
तेव्हा आपले गाव कसे स्वच्छ निर्मल होईल यासाठी एकट्याने नाही तर सर्वांनी संघटितपणे याचा अभ्यासपूर्वक व गांभीर्याने विचार करायला हवा. प्रत्येक गाव जर निर्मल झाले तर पर्यायाने तालुका, जिल्हा, राज्य व देशाचा ही परिपूर्ण विकास होईल. यासाठी गावातील लहान घरापासून ते मोठ्या घरापर्यंत याचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम पाया मजबूत करायला हवा .तरच सरतेशेवटी तो कळसापर्यंत म्हणजे स्वप्नपूर्ती कडे जाण्यास यशस्वी होईल. शिक्षणाने गावातील नागरिकांची प्रवृत्ती ही सकारात्मक होईल. त्यासाठी गावातील युवक, विद्यार्थी, स्त्रिया ,आणि प्रौढांना शिक्षणाचे महत्त्व पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. जर संपूर्ण गाव साक्षर झाले तर गावाचा विकास नक्कीच होईल. यासाठी शासनाचे अविरत व योजनाबद्ध कार्य चाललेच आहे. त्यासाठी गावातील जागृत युवकांनी हे काम गावातील लोकांपर्यंत पोहोचविणे व त्याचे महत्त्व पटवून देणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर शासनाकडून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मिळणार्‍या शैक्षणिक, आर्थिक सवलतींची माहिती व त्यांचे महत्त्व हे सर्वांत पर्यंत पोहोचल्या गाव हे शंभर टक्के साक्षर होण्यास वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न शासनाला भेडसावत आहे. त्यासाठी शेतीचे आधुनिकीकरण, शिक्षणासाठी ठोस पावले उचलणे, शेतीवर आधारित इतर व्यवसाय, कारखाने ,लहान-मोठे उद्योग, स्वयंरोजगार अशा सुविधा पुरवणे गरजेचे आहे. ग्रामीण युवकांना पारंपरिक व्यवसाय सोडून आधुनिक जगात चालण्यासाठी मदतीचा हात देणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण युवकांनी स्वतःबरोबर समाज हित जोपासावे. आजच्या वर्तमानातील युवकच उद्याच्या भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत. गाव तेथे ग्रंथालय ही एक उत्तम योजना आहे. त्यामुळे ग्रामीण लोकांचा शहरी भागाबरोबरच एकविसाव्या शतकातील जगाशी थेट संबंध येईल. ग्रंथालयामार्फत ग्रामीण युवकांना विविध क्षेत्रातील सखोल ज्ञान, मनोरंजन, संस्कृती ,आणि कला क्रीडा ,आरोग्य यांचा परिचय होईल व हे पर्यायाने युवकांच्या व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी माध्यम ठरेल. प्रौढ साक्षरता, वृक्षलागवड ,संगणक साक्षरता तसेच ग्रामीण योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. या बरोबरच ग्रामीण भागातील स्त्रियांचा विकास करणे हा एक प्रमुख विचार आहे. सध्या शासनाचे ग्रामीण भागातील स्त्रियांना सर्व क्षेत्रात न्याय देणे व त्यांचा विकास करणे हे उद्दिष्ट आहे. तेव्हा ग्रामीण स्त्रियांनीही याचा गांभीर्याने विचार करून या संधीचा फायदा घ्यावा व आपला विकास करावा.
    दुष्काळ ही ग्रामीण भागासाठी एक प्रमुख समस्या आहे. शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला योग्य किंमत नाही, असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. पाण्याचे प्रदूषण, वाढती जंगलतोड, पाण्याची नासाडी या आपल्याच मानवनिर्मित गंभीर चुकांचा अभ्यास करून योग्य उपाययोजना कराव्यात यासाठी शासनाकडूनही काही महत्त्वाच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, त्यांच्या आत्महत्या रोखणे, त्यांना कर्जात सवलत देणे ,त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर पाण्याचा स्त्रोत वाढवणे, पाण्याचा मर्यादित वापर, व योग्य साठवण यासाठी पारंपारिक पद्धती बरोबरच आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
   त्याचबरोबर सध्या ग्रामीण भाग कोरोनाच्या महा संकटातून नुकताच सावरलेला आहे. आणि पुन्हा या कोरोनाची लाट डोके वर काढत आहे.. तेव्हा सर्व गावाने संघटित होऊन इतर प्रश्नांबरोबर याही संकटाचा मुकाबला करावा.यासाठी शासनाच्या सर्व नियमांचा अभ्यास करून त्यांचे योग्य ते पालन करावे.  त्याच बरोबर बाहेरून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करूनच गावात प्रवेश द्यावा. तेव्हा आपल्या राज्याची खरी ओळख असलेल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाबरोबरच सर्व राजकीय पक्ष, नागरिक, युवक वर्ग ,स्त्रिया या सर्वांनी सगळे मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक गाव स्वच्छ निर्मल करूया व पर्यायाने देशाचा विकास करूया आणि आपल्या गावातच या प्रश्नाबाबत आपण सर्व पत्रकारांनी योग्य ती जबाबदारी घेऊन शासनापर्यंत आवाज उठवावा. तेव्हा आपल्या ग्रामीण भागाचे महत्व लक्षात घेताना.," मेरे देश की मिट्टी उगले हीरे मोती".. या काव्यपंक्तीचे सारे सार समजून घेऊया.
  .धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे वाई. जिल्हा सातारा.
मोबाईल नंबर.७७०९२४६७४०.


 
 ,