NC Times

NC Times

ग्रंथ संपदा


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) 
इथे पश्चाताप माणसाला झालेला नसून तो देवाला होतोय.
"माणसाला जन्माला घातल्यावर देवाला वाटलं.
समाधानी जीव जन्माला घातला
वर्षे लोटली तेव्हा लक्षात आलं.
आपला अंदाज अगदीच चुकला".
🌹 खरंतर युक्ती,बुद्धि, सारासार विचारशक्ती, कुठल्याही परिस्थितीत समाधानी राहणे, बोलणे चालणे, असा सर्व गुण संपन्न मनुष्य देवाने जन्माला घातला. कुठल्याही पशुपक्षी प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमान. पण मनुष्य आपली बुद्धी त्या देवाच्या चरणी लावायला तयार नाही. अखंड रामनामा सारखे साधे, सोपे काहीही करायलाच तयार नाही. सगळे संत, सगळे गुरु सांगून सांगून थकून गेले पण माणूस आहे तिथेच आहे. त्याला ८४ लक्ष जीव योनीतून फिरण्यात स्वारस्य असावे.
🌹"हिंदी संत वाङ्मयातील परमार्थ सोपान"या आपल्या ग्रंथात श्री गुरुदेव म्हणतात, नदीच्या पात्रात शिरलेल्या गजेंद्राचा(हत्ती) पाय सुसरीने तोंडात धरला होता तेव्हा तो सोडवण्यासाठी "आपले प्रयत्न व्यर्थ" आहेत हे जाणून गजेंद्राने देवाचा धावा सुरू केला. तेव्हा पूर्ण नाम उच्चारण्या आधीच नुसते "रा" म्हटल्याबरोबर देवाने त्याची सुटका केली. म्हणजे देवाला भक्ताची काळजी इतकी असते की त्याच्या तोंडून पूर्ण नाम येण्याची सुद्धा तो वाट बघत नाही.
🌹 माणसाने देव देव म्हणावे
"नाभी नाभी"(भिऊ नकोस) तो म्हणतच असतो.
एकदा तरी मनापासून हाक मारावी
तो आपल्या मागे उभाच असतो.
श्री गुरुदेव पुढे म्हणतात, ही कथा पुराणातली असली तरी त्या शोकाकुल झालेला गजेंद्राच्या अंतःकरणात जो परमेश्वर आहे तोच आपल्याही अंतकरणात आहे. मग आपल्या हाकेला तो का नाही धावून येणार ? फक्त आपला एवढा विश्वास, तेवढी श्रद्धा, तेवढी निष्ठा,तो माझा आहेच आणि मी त्याचा आहे ही खात्री असेल तर काहीच अशक्य नाही.
🌹 महिपतींचे शिष्य नरहरीनाथ म्हणतात, प्रत्येक क्षणाविषयी तू सावध रहा. पापणी लवण्या इतका वेळ सुद्धा व्यर्थ घालवू नकोस. तुला इथे अनंत काळ राहायचे नाही. हा डेरा केव्हा कोसळेल याचा नेम नाही. देवाविषयीचे तुझे कर्म कर आणि याच यांनी मुक्ती मिळव.
🌹 संत कबीर आपल्या "कहुरे जो कहिबे की होई"या पदार्थ म्हणतात सगळे जगच संतांच्या बाबतीत बेफिकीर असते. मी सर्व मानव्याची सुधारणा करण्याचे अखंड प्रयत्न केले तरी सर्व लोक बेफिकीर आहेत. याचे आश्चर्य वाटते. संताना कोणी मान देत नाही
असे येशू ख्रिस्त ही म्हणतात. महाभारतात श्रेष्ठ मुनी व्यास म्हणतात, दोन्ही हात
उभारून मी मोठ्याने ओरडून लोकांना माझे म्हणणे ऐकायला सांगतो पण कोणीच ऐकत नाहीत.(उर्ध्वबाहूर्विरोम्येष: नच कश्चित शृणोति माम्)
🌹 श्री समर्थ रामदास लिहितात, सांग सांगून दमलो, पाठी जगाच्या लागलो, जन ऐकेनासे झाले. जगाला उपदेश करण्याचा मला कंटाळा आला आहे पण लोक निष्काळजी व उदासीनच आहेत. त्यांच्यात सुधारणा करण्याची शिकस्त केली पण व्यर्थ. तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो! माझ्या तोंडून देवच बोलतो आहे. देवाच्या कृपेने पूर्ण भरलेले शब्दच मी सांगतो आहे." हाका मारून मी सांगे तूका नाम घेता राहो नका" वारंवार ताकीद देऊ नही जग माझे ऐकत नाही. याचे तुकाराम महाराजांना आश्चर्य व वाईटही वाटते आहे.
🌹 या बेफिकिरीच्या कारणांचा विचार करताना संत कबीर म्हणतात, प्रत्येक जण आपल्या लहरीप्रमाणे वागतो. अहंकार व लोभाने त्यांची मने बिघडलेली असतात.
. त्यांचे मन जवळजवळ मेलेले असते.. मरेपर्यंत व्यक्तिगत किंवा सामान्य आसक्तीत

ते बुडालेले असतात. त्यांना कळत नाही ते आत्मनाश करीत असतात. भवसागराच्या मध्यावरच अनेकजण थकून जातात किंवा असंख्य लोक या संसाररूपी सागराच्या तळास जातात पण आपण देवाचा हात धरावा अशी त्यांना बुद्धी होत नाही.
🌹 शेवटी जगाच्या या परिस्थितीबद्दल अत्यंत करुणा येऊन श्री कबीर आपण स्वतः देवदूत असल्याचे जाहीर करतात. ते लोकांना सांगतात," देवाने माझ्यावर कृपा केली व मला काही संदेश देऊन तो अमलात आणण्याचे सामर्थ्य मला दिले" तो संदेश असा, की "काही लोकांना तरी निदान तू मुक्त कर. त्यांचे जीवन प्रकाश मय कर." पुढे ते म्हणतात आता मुक्ती मिळाली नाही तर त्याबद्दल तुम्ही आपल्या स्वतःला दोष द्या. मला दोष देऊ नका.
🌹 तेव्हा आता तरी आपण ठरवूया की अखंड नामस्मररणाने श्री कबीर म्हणतात त्याप्रमाणे आपले जीवन प्रकाशमय करायचे की नाही, मुक्त व्हायचे की नाही, प्रपंच करताना दाखवतो ती चिकाटी परमार्थात दाखवू या. सगळ्या संतांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून अखंड नामस्मरण करूया. नाहीतर सगळे आयुष्य स्वतःला दोष देण्यात कसे संपेल ते कळणारही नाही. आयुष्य सगळे पश्चाताप करण्यात जाईल. मिळेल ती शिक्षा भोगणात जाईल.
🌹 देव सुद्धा कोणाला
उगीच शिक्षा देत नसतो
कुठल्या तरी जन्माचं
काहीतरी पाप निश्चित असतं."
या जन्मी परत तेच पाप आमच्या हातून घडू देऊ नका, ही गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करूया.
🌹 राजाधिराज सद्गुरु नाथ महाराज की जय🌹
(संदर्भ ग्रंथ--श्री गुरुदेव रानडे लिखित हिंदी संत वाङम
यातील परमार्थ सोपान")