NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न कुस्ती मैदानासही मोठा प्रतिसाद

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)
:- ' उदं ग आई उदं ' च्या गजरात भंडारा खोबर्याच्या उधळणीत व भव्य अशा सुवाद्यासह निघालेल्या पालखी मिरवणुकीने घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी मंदिर परिसरात भाविक भक्तांनीही देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
     शुक्रवार दि २६ रोजी देवीची बोनी व नैवेद्य पार पडला.तर शनिवार दिनांक २७ हा यात्रेचा मुख्य दिवस होता.यावेळी मंदिर परिसरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पार पडले.सदर दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत मास्टर जयसिंग पाचेगावकरसह नृत्यतारका लता- लंका पाचेगावकर यांचा बहारदार अशा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला. 
      तर शनिवार दिनांक २७ रोजी अगदी सकाळ पासूनच देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली होती.या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला.तर सकाळी दहा वाजता खाडेच्या मेटापासुन सुवाद्यसह पालखी मिरवणूकीला सुरवात करण्यात आली.यावेळी भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती.सदर मिरवणूकही गावातील प्रमुख मार्गावरून फिरुन दुपारी चार नंतर कीचाच्या माळावर नेहण्यात आली.तेथे किचाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाली. 
     याच दिवशीच दुपारी तीन वाजता यात्रे निमित्तानेच कुस्त्यांचे मैदान पार पडले.यामध्ये अनेक लहान मोठ्या चटकदार अशा कुस्त्या पार पडल्या.सदर मैदानास खासदार संजय (काका) पाटील,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित (दादा) पाटील व डब्बल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांनी भेटी देऊन मैदानास चांगलीच रंगत आणली होती.तर रविवारी सायंकाळी सात वाजता निमित्ताने जल्लोष ऑर्केस्ट्राच बहारदार आसा कार्यक्रम झाला.यात्रे मध्ये पाळणेवाले,खेळणीवाले,मिठाईवाले व छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाची मोठी रेलचेल दिसून येत होती.यात्रा कमिटीच्या वतीने व पोलीस प्रशासनाने यात्रेत चोख अशी व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्याचबरोबर यात्रेनिमित्तने रंगावलीकार मोहन पवार यांनी विविध मंदिर परिसरात काढलेल्या रांगोळी ही यात्रेकरुंचे लक्ष वेधून घेत होते.